अतिरिक्त प्रवेशातून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:14 PM2018-05-08T18:14:37+5:302018-05-08T18:14:37+5:30
नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयात नियमबाह्य परीक्षार्थी आढळून आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या चौकशीअंती शिक्षणाचा बाजार मांडणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
सेनगाव (हिंगोली ) : नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयात नियमबाह्य परीक्षार्थी आढळून आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या चौकशीअंती शिक्षणाचा बाजार मांडणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. यावरून गटशिक्षणाधिकारी यांच्या फिर्यादीवरून दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक पदाधिकारी अशा नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहावी परीक्षेत वयस्क व अतिरिक्त परीक्षार्थी प्रवेशाने तालुक्यातील संत रेखेबाबा विद्यालय व संत गजानन माध्यमिक विद्यालय चांगलेच चर्चेत आले. कुठल्याची भौतिक सुविधा नसताना दोन्ही विद्यालयात प्रवेश दाखविल्या व्यतिरिक्त जवळपास ३७८ परीक्षार्थी अतिरिक्त आढळून आले. यामुळे ऐनवेळी सेनगाव येथे अतिरिक्त दोन परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली. कशीबशी परीक्षा पार पडल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत याची सखोल चौकशी केली. अतिदुर्गम भागातील या दोन केंद्रावर अतिरिक्त परीक्षार्थी आलेच कसे याचा शिक्षण विभागाने शोध घेतला. चौकशीअंती दोन्ही महाविद्यालयाने शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. अवैधरित्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत परीक्षेत पास करण्याची मोठी साखळीच यातून उघडकीस आली.
यावरून सोमवारी रात्री उशिरा गटशिक्षणाधिकारी सिताराम जगताप यांच्या फिर्यादीवरून संत रेखेबाबा विधालयात चे मुख्याध्यापक पांडुरंग विठ्ठल कचरे ,शिक्षक पवन गौतम गायकवाड, संस्थाध्यक्ष दिपक अशोक सिरामे, उपाध्यक्ष चंद्रकांत शेषराव हराळ, सचिव अशोक सिताराम सिरामे तर संत गजानन माध्यमिक विधालयाचे मुख्याध्यापक राजकुमार पांडुरंग वाकळे, संस्थाध्यक्ष भगवान रामभाऊ लहाने, उपाध्यक्ष मंदाताई नारायण गावडे, सचिव सत्यभामा भिमराव खरात अशा एकुण नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, फौजदार किशोर पोटे हे करत आहेत. मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.