खांडेगाव पाटीवरील चार दुकानांना आग; सोयाबीन, कापूस जळून खाक
By विजय पाटील | Published: November 24, 2023 03:14 PM2023-11-24T15:14:30+5:302023-11-24T15:16:23+5:30
५ लाख रुपयांचे नुकसान ; वसमत-परभणी मार्गावरील घटना
हिंगोली: परभणी-वसमत मार्गावरील खांडेगाव पाटीवरील अडतीसह चार दुकानांना शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत दुकानांतील सोयाबीन, कापूस यासह इतर अन्नधान्य जळून खाक झाले. या घटनेत ५ लाख रुपयांवर नुकसान झाले आहे. सदर आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते.
वसमत-परभणी मार्गावरील खांडेगाव पाटीवर असलेल्या दुकानांना २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान अचानक आग लागली. या दुर्घटनेत व्यापारी ज्ञानेश्वर नरवाडे (रा. सातेगाव), गंगाधर हेगडे (रा. देऊळगाव) यांच्या दुकानातील सोयाबीन, कापूस जळून खाक झाले. तर डुकरे यांच्या हॉटेलमधील साहित्य जळाले. या घटनेत ५ लाखांवर नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आग आटोक्यात येऊ शकली नाही. सदर आगीत अडत दुकानातील सोयाबीन, कापूस यासह इतर धान्य जळून खाक झाले आहे. आगीत ५ लाखांवर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांना मिळाली. त्यांनी जमादार संजय गोरे, अजय पंडित यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.