'फायरिंग होवून खून झाला'; खोडसाळपणे फोन करणाऱ्यास पोलिसांनी घडवली अद्दल
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: February 11, 2023 04:07 PM2023-02-11T16:07:09+5:302023-02-11T16:07:49+5:30
पोलिसांना खोटी माहिती देणे पडले महागात
हिंगोली : फायरिंग होवून एकाचा खून झाला असल्याची खोटी माहिती डायल ११२ वर देणे एकास चांगलेच महागात पडले. औंढा पोलिसांनी त्याचेवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार औंढा येथे ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला.
अडचणीत सापडलेल्यांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने डायल ११२ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक चारचाकी व दुचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डायल ११२ वर कॉल आल्यानंतर काही मिनिटातच हे पथक घटनास्थळी दाखल होते. मात्र काही जण पोलिसांना त्रास व्हावा या उद्देशाने फेक कॉल करून पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे. औंढा येथील सिद्धार्थनगरातील आंबेडकर चौकात फायरिंग झाली असून एकाचा खून झाला असल्याचा डायल ११२ वर कॉल आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्ता ठोंबरे, गणेश राठोड, पोलिस अंमलदार हनुमंत बेले, सचिन मस्के, विनायक सुपेकर, निता ठोके यांचे पथक घटनास्थळी पाठविले.
हे पथक अवघ्या काही मिनीटांतच घटनास्थळी दाखल झाले. पथक पोहचल्यानंतर परिसरात विचारपूस केली असता येथे कोणतीही फायरिंग झाली नाही. तसेच खूनाची घटनाही घडली नसल्याचे तेथील लोकांनी सांगितले. पोलिसांना त्रास व्हावा या उद्देशाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच डायल ११२ वर कॉल केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिस अंमलदार निता ठोके यांच्या फिर्यादीवरून ९८२८१५९८४७ या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा नोंद झाला. मोबाईल क्रमांक ट्रेस करून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिस हवालदार हरकाळ तपास करीत आहेत.