महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:20 IST2018-06-27T19:19:52+5:302018-06-27T19:20:26+5:30
महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे.

महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत
हिंगोली : येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ मे २०१७ रोजी या उपकेंद्राचे भूमिपूजन केले होते. खाकीबाबा मठ उपकेंद्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपकेंद्रातून नवीन आठ ११ केव्ही वीज वाहिन्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हिंगोली शहराची विजेची गरज लक्षात घेवून गॅस इन्सुलेटेड प्रणालीचा उपयोग करत (जीआयएस) खाकीबाबा मठ उपकेंद्राची उभारणी केवळ बाराशे स्क्वेअर मीटर जागेमध्ये करण्यात आली आहे. पायाभूत आराखडा विभागामार्फत ३ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन औरंगाबाद येथील आयडिया इंजिनिअर्स या कंपनीने या उपकेंद्राची उभारणी केली.
उपकेंद्रासाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांचे मार्गदर्शन तर तत्कालीन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे यांनी केलेला पाठपुराव्यामुळे काम गतीने झाले. तसेच अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, के.एस. रामटेके, अति.कार्यकारी अभियंता कोथळे, सहायक अभियंता पवार, हिंगोली मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस.एस. चौधरी, कार्यकारी अभियंता आर.जी.लोंढे, अति.कार्यकारी अभियंता जी.टी. महाजन, उपकार्यकारी अभियंता डी.ई. पिसे, सहायक अभियंता वानखेडे, ए.आर.नळे, एन.व्ही. पिन्नेंटी, एस.डी.बेरसाळे, एन.डी. मांडोकार, स्थापत्य विभागाचे उपकार्यकारी अभियंता खंदारे आदींनी परिश्रम घेतले.
अखंडित व योग्य दाबाची वीज...
या उपकेंद्राचा लाभ हिंगोली शहरातील जवळपास चार हजार वीज ग्राहकांना होणार आहे. अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यास उपकेंद्राची मदत होणार आहे. लिंबाळा येथील २२० केव्ही या अतिउच्चदाब विद्युत केंद्राद्वारे खाकीबाबा मठ उपकेंद्रास ३३ केव्ही दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवण्याचे उद्देशाने केंद्रशासनाच्या ऊर्जा विभागाच्या वतीने शहरी भागातील विद्युतीकरणासाठी अर्थसहाय्य केले जात असून एकात्मिक ऊर्जा विकास योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या वतीने अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्रे उभारली जात आहेत.