पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच कापडसिंगी येथे शस्त्रक्रिया विभाग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:58+5:302021-01-08T05:36:58+5:30
पहिल्या शिबिरात १४ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. कापडसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पंधरा वर्षांपासून कुटुंब ...
पहिल्या शिबिरात १४ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. कापडसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पंधरा वर्षांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जात नव्हते. या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली होती; परंतु या सर्व अडचणींवर मात करीत आरोग्य विभागाने तब्बल पंधरा वर्षांनंतर या आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया विभाग चालू केला.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. ५ जानेवारी रोजी पार पडलेल्या शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्जन डॉ. रामहरी बेले, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ काकडे आदी उपस्थित होते. या शिबिरात एकूण १४ स्त्री शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या सर्जन डॉ. रामहरी बेले यांनी केल्या. तालुका सुपरवायझर अशोक जोशी यांनी प्रा. आ. केंद्राच्या शस्त्रक्रिया गृहाचे स्वॅब नांदेड येथे तपासणीसाठी सहकार्य केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोकांना ऑपरेशनची सुविधा कापडसिंगी येथेच सुरू झाल्यामुळे या कार्यक्षेत्रातील लोक समाधान व्यक्त करीत आहेत. या शिबिरासाठी सुपरवायझर अशोक जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ काकडे, औषध निर्माण अधिकारी नितीन वाढवे, आरोग्य सहायक सखाराम साबळे, दिलीप काकडे आरोग्य कर्मचारी मारोतराव पोले, प्रताप साबळे, गणेश पुरी, प्रकाश वाडेकर, अशोक गरपाळ, सविता गणेश श्रीमती कांबळे, श्रीमती गुडधे, श्रीमती जामनिक, श्रीमती ठोके, श्रीमती इंगोले, श्रीमती पवार, श्रीमती देवकर, रेखा हाके, जाधव, हाके, माळोदे, निशांत चव्हाण, सतीश हाके, श्रीमती खंदारे, श्रीमती कोकिळाबाई व कौशल्यबाई आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रा. आ. केंद्राला एकूण उद्दिष्ट २०२ एवढे आहे. तरी पुढील तीन महिन्यांमध्ये हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. यापुढे दर मंगळवारी कुटुंब कल्याण शिबिर आयोजित करण्यात येणार असून, परिसरातील जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुणवाल यांनी केले आहे.