पाच जणांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:35 PM2017-12-29T23:35:32+5:302017-12-29T23:35:38+5:30
औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
औंढा तालुक्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले अन् आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. शिरड शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वगरवाडी गाव येते. डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले. तिघांचा बळी गेला. हा प्रकार समोर आल्यानंतरच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व साथरोग नियंत्रणासाठी उपाय-योजना सुरू केल्या, हे विशेष. परंतु वगरवाडी येथील तीन व्यक्तींच्या मृत्यूनंतरही गावात साथच पसरली नाही, असे आरोग्य विभागाकडून ठणकावून सांगितले जात आहे. गावात डेंग्यूची साथ आहे, हे पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पाच जणांच्या रक्त नमुन्यांवरूनच सिद्ध होणार, असा पवित्रा मात्र आरोग्य विभागाने घेतला आहे. पुणे येथे पाठविलेल्या रक्त नमुन्यांचा अहवाल येणास सहा ते सात दिवस लागणार असल्याचे विभागातर्फे सांगितले. तर गावातील बळी डेंग्यूच्या साथीमुळेच झाला, असे येथील ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेला तपासणी नमुन्यांची प्रतीक्षा आहे.
तपासणी : ...तरच डेंग्यूची साथ
एकाच आजाराची चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना लागण झाल्यास साथरोग म्हणता येईल. त्यामुळे गावात डेंग्यूचीच साथ आहे, असे म्हणता येणार नाही. गावात खरेच साथ पसरली आहे का, हे रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल आल्यावरच समजणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील अहवाल ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे वगरवाडी येथील पाच जणांचे रक्तजल नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून ते अहवाल प्राप्त होताच साथरोग आहे किंवा नाही. हे निष्पन्न होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.