निवडणूक खर्च दाखल न केल्याने सरपंचासह पाच जणांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 07:30 PM2018-03-28T19:30:21+5:302018-03-28T19:30:21+5:30
कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च दाखल न केल्याने त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकार्यांनी रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च दाखल न केल्याने त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकार्यांनी रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आखाडा बाळापूरपासून जवळच असलेल्या या ग्रामपंचायतची सदस्यसंख्या सात असून सरपंचपद वेगळे आहे. थेट जनतेतून सरपंच संभाजी खिल्लारे हे निवडून आले होते. मात्र या सर्व जणांनी निवडून आल्यानंतरही निवडणूक खर्च सादर केला नव्हता. ७ नोव्हेंबर २0१७ पर्यंत निवडणूक खर्च दाखल करणे अनिवार्य असताना या सर्वांनी ८ जानेवारी २0१८ रोजी पोष्टाद्वारे खर्च सादर केला होता. कळमनुरी तहसीलदारांचा तसा अहवालही आहे. याबाबत अन्य एक ग्रा.पं.सदस्य सचिन गंगाधर बहिवाळ यांनी जिल्हाधिकार्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकार्यांनी युक्तिवाद ऐकून घेतला. त्यात अशिक्षितपणा, आजारपण, व इतर कारणांमुळे खर्च दाखल करण्यास विलंब झाल्याचे संबंधित ग्रा.पं.सदस्य व सरपंचांचे म्हणने होते.
यावर जिल्हाधिकार्यांनी युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ ख (१) मधील तरतुदीनुसार ५ वर्षांकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. यामध्ये सरपंच संभाजी खिल्लारे यांच्यासह ग्रा.पं.सदस्या निर्मलाबाई शिवाजी उपरे, नारायण रामराव उपरे, अर्चना नामदेव बुरकुले, पांडुरंग किशन खिल्लारे या पाच जणांचा समावेश आहे. निवडणूक खर्च दाखल न केल्याने झालेल्या या कारवाईनंतर ग्रा.पं.सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी असा खर्च दाखल केलेला नव्हता.