दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद; हत्यारासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 02:04 PM2023-12-01T14:04:22+5:302023-12-01T14:04:54+5:30
बाळापूर पोलिसांची कारवाई आज पहाटे कारवाई
आखाडा बाळापूर : बाळापूर शहरालगतच्या रस्त्यावर हत्यारबंद पाच संशयित दरोडेखोरांना बाळापूर पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले. दरोड्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई करून हत्यारासह 7 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमाननगरच्या समोर बाळापुर ते बोल्डा रस्त्यावर ज्ञानसागर शाळेच्या अलीकडे शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर दरोडेखोर असल्याची खबर बाळापुर पोलिसांना आज पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास मिळाली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व त्यांच्या पथकाने लागलीच तिथे जात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. तर कुऱ्हाडी, खंजर, तलवार बॅटरी, मोबाईल व पिकअप वाहन ( क्र.एम.एच26 बीई -2821) असा एकूण 7 लाख 30 हजार 740 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या फिर्यादीवरून, सय्यद सोहेल सय्यद युनूस (वय 22 , राहणार ढाणकी तालुका उमरखेड ) , सय्यद रमजान सय्यद अब्दुल ( वय 22 , राहणार ढाणकी तालुका उमरखेड ) , अल्फाजोद्दीन उर्फ गौसोद्दीन मुजिबोद्दीन काझी ( वय 21 , राहणार सुकळी जहांगीर तालुका उमरखेड ) शेख जहीर शेख बाबू ( वय 19 , राहणार ढाणकी तालुका उमरखेड ) , सय्यद अजमत सय्यद रहिम ( वय 20, रा. ताज नगर, आखाडा बाळापूर) या पाच जणांच्या विरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 399 , 402 व भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख माजिद करत आहे.