आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस उपाधीक्षकासह पाच महिलांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:30 PM2022-07-02T12:30:48+5:302022-07-02T12:32:05+5:30
जीवे मारण्याची धमकी दिल्याने युवकाने व्यथित होऊन केली आत्महत्या
हिंगोली : अनैतिक संबंधाबाबत सर्वासमोर बोलल्यामुळे युवकास त्रास देवून त्यास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी प्रभारी पोलीस उपाधीक्षकासह (गृह) पाच महिलांविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. या संदर्भात मयत युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या मांडला होता.
विलायत खॉ पठाण (रा. मस्तानशहानगर, हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विलायत पठाणने आरोपींचे अनैतिक संबंध असल्याची सर्वांसमोर वाच्यता केली होती. यामुळे आरोपींनी विलायत पठाण यांचेवर विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विलायत पठाण यांनी ३० जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी रिझवाना विलायत खॉ पठाण (रा.मस्तानशहा नगर ह.मु. पुरजळ ता. औंढा) यांच्या फिर्यादीवरून सलमा बेगम सलाम पठाण, सुलताना सलाम पठाण, रेश्मा सलाम पठाण, रूकसार सलाम पठाण, रूबीना सलाम पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपाधीक्षक वसीम हश्मी (सर्व रा. मस्तानशहा नगर) यांचेविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तपास करीत आहेत. दरम्यान, पोलीस उपाधीक्षकासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता.