हिंगोली जिल्ह्यात फ्लोराईडग्रस्त गावे अद्याप दुर्लक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:06 AM2017-12-16T00:06:00+5:302017-12-16T00:06:05+5:30
जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.
हिंगोली जिल्ह्यात तब्बल १९८ गावांमध्ये फ्लोराईडची समस्या आढळून आली होती. यामध्ये औंढा-१, वसमत-१६, सेनगाव-४६, कळमनुरी-६८, हिंगोली- ६७ अशी तालुकानिहाय गावांची संख्या होती. त्यात फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होत असलेल्या गावांतील लोकांना हाडांचे आजार जडत आहेत. तसेच दातेही पिवळी पडली. काहींचे दात एवढे झिजले की तारुण्यातच वार्धक्याचा अनुभव येत आहे. परंतु याबाबत हरित लवादाकडे प्रश्न गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अनेक ठिकाणचे स्त्रोत सील केले होते.
दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आली अन् ग्रामस्थांनी त्यात पाण्यासाठी असे स्त्रोतही अनेक ठिकाणी उघडे केले. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतींनी लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र टंचाईपुढे काहीच चालले नाही. फ्लोराईडग्रस्त गावांपैकी जवळपास १३ गावांत त्यावेळी कोणतीच पाणीपुरवठा योजना नव्हती. त्यानंतर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आता नेमकी काय परिस्थिती आहे. याचा कोणालाच ताळमेळ नाही. आरोग्य विभाग अहवाल देवून मोकळा झाला. पाणीपुरवठा विभागाने ही गावे प्राधान्य यादीत तेवढी टाकली. त्यापुढील औपचिरकतांचे मात्र काहीच होत नाही.
आता नव्याने या गावांसाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर कारवाई सुरू झाली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी बैठक घेतल्यानंतर १0४ गावांतील १४५ स्त्रोत फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले असे सांगितले जात आहे. तर या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासण्या झाल्याचेही सांगितले जाते. त्यात केवळ दातांचे आजार असलेले लोकच आढळले. इतर प्रकारचे आजार असलेले रुग्ण नव्हते, असा अहवाल आहे. मात्र या सर्व गावांत फेरतपासणी होणे गरजेचे आहे. शिवाय अनेक गावांनी पुन्हा सील उघडून स्त्रोत वापरणे सुरू केले होते. तेही बंद होणे गरजेचे आहे. खºया अर्थाने तपासणी झाली तर यात रुग्णांची संख्या जास्त आढळून येण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी : कृती आराखडा सादर करा
हिंगोली जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त गावांची फेरतपासणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आढळून आलेल्या सर्व गावांत पाणीपुरवठ्याच्या काही उपाययोजना आहेत की नाहीत. नसतील तर नवीन योजना अथवा प्रादेशिक योजना व इतर योजनांवरून अशा गावांना पाणी देण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचा आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली आहे. फ्लोराईडग्रस्त गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. त्यामुळेच वस्तूनिष्ठ अहवाल मागविला आहे.