आडगाव येथे जबरी चोरी; दागिने, रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:58 IST2019-09-13T23:57:54+5:302019-09-13T23:58:13+5:30
वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घालत एका घरातील अंदाजे ७० ते ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

आडगाव येथे जबरी चोरी; दागिने, रोकड लंपास
आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घालत एका घरातील अंदाजे ७० ते ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
आडगाव रंजे येथील बसस्थानक परिसरातील सोपान तातेराव चव्हाण यांच्या घरी बुधवारी रात्री १ ते ३ च्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटामधील नगदी ५२ हजार ५०० रुपये, सात ग्राम सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केला आहे. घरातील मंडळी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी हा डल्ला मारला. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे चव्हाण कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ हट्टा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोउपनि ज्ञानेश्वर शिंदे, जमादार बबन राठोड, दिलीप वळसे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी हिंगोली येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरी झालेल्या वस्तूंना घरातील सदस्यांनी हात लावल्याने श्वान पथकाला चोराचा माग काढता आला नाही. याप्रकरणी हट्टा ठाण्यात सोपान चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. तपास सपोनि शंकर वाघमोडे, पोउपनि ज्ञानेश्वर शिंदे करीत आहेत. पावसाळ्यात वीज वारंवार खंडित होत असल्याने चोरटे सक्रीय झाले आहेत.