चड्डी-बनियन टोळीची हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी;कंपाउंडर, डॉक्टरला मारहाण,लाखोंचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:21 PM2022-07-25T17:21:48+5:302022-07-25T17:22:44+5:30
दागिने कुठे आहेत? पैसे कुठे आहेत? असे विचारून, तुम्ही जर आम्हाला दागिने, पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मुलाला मारू, अशी धमकी दिली.
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देशमुख हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी करून कंपाउंडर, डॉक्टरलाही टाॅमीने मारहाण केली. सोन्याचे दागिने व नगदी दोन लाख रुपये रोकड असा जवळपास चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी बाळापूर परिसरात दहशत निर्माण केली. चोरीचे प्रकार वाढल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
आखाडा बाळापूर येथील नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर बसस्टँडच्या पाठीमागे डॉ. सचिन देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आहे. खाली दवाखाना व वर निवासस्थान असलेल्या या हॉस्पिटलमध्ये २४ जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने प्रवेश केला. कंपाउंडरला मारहाण करून जखमी केले. पैसे, दागिने कुठे आहेत ते सांग, असे म्हणून त्याला फरपटत वर नेले. त्याला एका टेबलवर झोपवून आवाज न करण्याची तंबी दिली. एक चोरटा कंपाउंडर जवळ थांबला, तर दोघे वर गेले. शोधाशोध करत असताना आवाज झाल्याने, डॉ. देशमुख यांना चोरटे घरात शिरल्याचा अंदाज आला. त्यांनी झटपट पुन्हा बेडरूमचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला; पण चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. हातात असलेल्या टॉमीने डॉ. देशमुख यांच्यावर वार केला. त्यांनी डोक्यातला वार चुकविला; पण पाठीमध्ये त्यांना मार बसला. उजव्या पायावरही टाॅमीने मारहाण केली. त्यानंतर, डॉक्टर शांत बसले. दागिने कुठे आहेत? पैसे कुठे आहेत? असे विचारून, तुम्ही जर आम्हाला दागिने, पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मुलाला मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर, गळ्यातले लॉकेट, कुटुंबीयांचे दागिने असे आठ तोळ्यांचे दागिने त्यांनी चोरून नेले.
चड्डी-बनियन व चेहऱ्याला मोठा मास्क लावलेल्या चोरट्यांची दहशत
डॉ. देशमुख यांनी घरात ठेवलेली अडीच ते तीन लाख रुपयांची रक्कमही घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, पोलिसांच्या वाहनाच्या सायरनचा आवाज येताच चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूनेच पळ काढला. तीन चोरटे चार लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले. बाळापूर परिसरात चोरटे घुसल्याची खबर एक ते दीड वाजताच पोलिसांना मिळाली. साईमंदिर परिसरातील माधवनगरमध्ये चार ते पाच घरांची कडी-कोयंडे बाहेरून लावून घेतल्याने चोरटे आले असल्याचे गल्लीत समजले. पोलिसांनी शेवाळा, देवजना, कवडी या भागांतील ग्रामस्थांना जागे केले. दोन चोरटे देवजना गावात आले असल्याचे कळताच पोलिसांची गाडी तिकडे रवाना झाली. त्याच दरम्यान दुसऱ्या तीन चोरट्यांनी डॉ. सचिन देशमुख यांच्या दवाखान्यात धुडगूस घातला. चड्डी-बनियन व चेहऱ्याला मोठा मास्क लावलेल्या चोरट्यांनी बाळापूर परिसरात दहशत निर्माण केली आहे.
याप्रकरणी चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या कंपाउंडर विकास घोडगे याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले; पण श्वानपथक जागेवरच घुटमळले. याप्रकरणी डॉक्टर सचिन देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बंद....
दवाखान्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसविली आहे; परंतु दोन दिवसांपूर्वी त्याची स्क्रीन बंद झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी हे कॅमेरे बंद ठेवले असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहिले असते तर कदाचित चोरट्यांना त्यात टिपता आले असते. पोलिसांना तपासात मदत झाली असती; पण दोन दिवसांपूर्वीच नादुरुस्त झाल्याने ते बंद ठेवले होते.