मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी वीज तोडल्याने औंढ्यात सक्तीचे भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:22 PM2019-08-30T18:22:10+5:302019-08-30T18:23:46+5:30
सकाळी ६ वाजताच वीज वाहिन्या काढण्याची मोहीम
औंढा नागनाथ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औंढानगरीतून जात आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी भाजपने जोरदार तयारी केली.मात्र,महावितरणने मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी वीजतारा तोडल्याने औंढेकरांना अनावश्यक भारनियमनचा फटका बसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रथयात्रा हट्टा, जवळा मार्गे औंढ्यात येत आहे. या मार्गाचे रूंदीकरण झाल्याने आधीच वृक्षतोड झालेली आहे. काही ठिकाणी या रथाच्या मार्गात फांद्याचा अडथळा येऊ नये म्हणून त्या तोडल्याची दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने खाचखळगे असून त्यावर मात्र कोणताही उपाय करता आला नाही. दुसरीकडे औंढा शहरानजीक महावितरणच्या तारा रस्ता ओलांडून गेलेल्या आहेत. त्या अपेक्षित उंचीवर असल्या तरी मुख्यमंत्री घेऊन येत असलेल्या रथापेक्षा कमी उंचीवर आहेत. त्यामुळे रथाला तारा लागून अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरणने या मार्गावर अनेक ठिकाणी तात्पुत्या तारा काढून घेतल्या आहेत. सकाळी ६ वाजताच ही मोहीम सुरू झाली. आता मुख्यमंत्री औंढ्यातून हिंगोलीला पोहचेपर्यंत औंढेकरांना विजेशिवाय राहावे लागणार आहे.