शेतकऱ्यांच्या बनावट सह्या केल्या; विमा कंपनीसह पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By विजय पाटील | Published: October 19, 2023 02:55 PM2023-10-19T14:55:35+5:302023-10-19T14:58:01+5:30
पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे २०२२ मध्ये शेतकऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून सर्व्हेक्षण केल्याबद्दल आयसीआयसीआय लोंगबार्ड जनरल इन्सुरंन्स कंपनीसह या कपंनीचे पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
२३ व २४ ऑगस्ट २०२२ रोजी औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्याचा सर्व्हे करण्यासाठी आयसीआयसीआय लोंगबार्ड जनरल इन्सुरन्स कंपनीचे कर्मचारी या गावात गेले. मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या मारून सर्व्हेमध्ये वस्तूस्थिती न दाखवता आपल्या सोयीने नोंदी घेतल्याचा प्रकार लक्षात आला होता. याबाबत तक्रारीही झाल्या. यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले होते. या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता या प्रकारला वर्ष उलटले. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी सतीश अरविंद बोथीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पुणेस्थित आयसीआयसीआय लोंगबार्ड विमा कंपनीसह त्यांचे पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांनी २३ व २४ ऑगस्ट २०२२ रोजी बोगस सर्व्हे केला. यात पिंपळदरी येथे सर्व्हेक्षण केलेल्या १० पैकी ८ शेतकऱ्यांच्या फॉर्मवर बोगस, खोट्या स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांची फसवणूक केली.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून टाळाटाळ केली जात होती. शिवाय रक्कम वाटपात विलंब केल्यावरही कृषी विभाग पीक विमा कंपनीवर कायम मेहेरनजर दाखवत आला आहे. वर्षभरानंतर या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यतत्परता दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.