श्रवणयंत्र विसरला अन जीव गमवला; मुकबधीर युवकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 04:41 PM2020-02-19T16:41:26+5:302020-02-19T16:44:00+5:30
रेल्वे पटरी ओलांडताना बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पूर्णा अकोला पॅसेंजर रेल्वेचा हार्न त्यास ऐकू आला नाही
नांदापूर (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील हारवाडी शिवारात रेल्वेच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ फेबु्रवारी रोजी घडली.
हारवाडी येथील मुकबधीर युवक लक्ष्मण किसन नरोटे (२१) हा शेताकडे जाण्यासाठी निघाला होता. रेल्वे पटरी ओलांडताना बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पूर्णा अकोला पॅसेंजर रेल्वेचा हार्न त्यास ऐकू आला नाही, आणि रेल्वेच्या धडकेत हा युवक बाजूला फेकला गेला. यावेळी युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी ग्रामस्थ धावून आले व जखमी युवकास उपचारासाठी कळमनुरी येथील रूग्णालयात घेऊन जात होते. परंतु उमरा फाटा येथे रस्त्याच लक्ष्मणने प्राण सोडले. युवक नेहमी कानातील श्रवणयंत्र घालत असे. परंतु आज तो हे यंत्र घरीच विसरला होता. त्यामुळे रेल्वेचा आवाज त्याला ऐकू आला नाही. आणि हा अपघात झाला. युवकाच्या अपघाती मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. काही महिन्यांनी त्याचे लग्नही होणार होते, आणि पत्रिकाही छापल्या होत्या, असे नातेवाईकांनी सांगितले. परंतु या दुर्दैवी घटनेत लक्ष्मणचा मृत्यू झाला आहे.