वसमतमध्ये अधिकृत एनए लेआऊटला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:23+5:302020-12-31T04:29:23+5:30

वसमत : येथे भूखंडमाफियांनी घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे. अधिकृत एनएला जादा पैसे व जास्तीची ...

Format the official NA layout in Wasmat | वसमतमध्ये अधिकृत एनए लेआऊटला फाटा

वसमतमध्ये अधिकृत एनए लेआऊटला फाटा

Next

वसमत : येथे भूखंडमाफियांनी घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे. अधिकृत एनएला जादा पैसे व जास्तीची जागा सोडावी लागत असल्याने एनए लेआऊट न करताच भूखंडाची विक्री सुरू आहे. ग्रामपंचायतच्या गाव नमुना आठच्या आधारावर सुरू असलेल्या या प्रकाराने भविष्यात अडचणी येणार हे स्पष्ट आहे.

शासनाच्या महसूललाही सुरुंग लागत आहे. झटपट पैसा कमावण्याच्या नादात वेगवेगळे फंडे वसमतमध्ये निर्माण होत असतात. एनए लेआउट न करता वसाहती तयार करण्याचा अघोरी प्रकार जोरात सुरू आहे. ग्रामपंचायत गावठाण हद्दीबाहेर असलेल्या शेतजमिनीच्या सर्वे नंबरला गाव नमुना आठ देण्याचे धाडस काही ग्रामसेवक करीत आहेत. त्याच्या आधारावर अनधिकृत वसाहती, नगर उभे करुन मोठी कमाई केली जात आहे. शहराच्या हद्दीबाहेरील शेतजमिनी खरेदी करुन खाजगी इंजिनिअरकडून नकाशे तयार करायचे, हेच नकाशे लेआऊट असल्याचे भासवले जात आहे. चुन्याच्या दोऱ्या आराखडे तयार करुन नगराचे नाव देवून भूखंड विकण्याच्या प्रकाराने कहर केला आहे.

भूखंडमाफियांना या कामात गाव नमुना आठ व रजिस्ट्री करुन मिळत असल्याने मदत होत आहे. वास्तविक शेतजमिनीवर नागरी वसाहत किंवा अकृषिक वापरासाठी अधिकृत एनए लेआऊटची गरज असते. नगररचना कार्यालयाकडून लेआऊट मंजूर झाल्यानंतर संबंधित प्राधिकरण मालमत्तेची नोंद घेत असते. मात्र, वसमतमध्ये या प्रकाराला फाटा दिल्या जात आहे.

अधिकृत एनए लेआऊटमध्ये ओपन स्पेस, रस्ते व इतर सुविधा असतात. मात्र, कमी जागेत जादा प्लॉट काढण्यासाठी एनएलाच फाटा देण्याचा प्रकार समोर येत आहे. कोणताच कायदेशीर आधार नसलेले नकाशे व कागदपत्रे नसताना भूखंड खरेदी - विक्री हाेत आहे. असे भूखंड खरेदी केले तर शेतजमिनीची सातबारा मूळ मालकाच्याच नावावर राहते. त्यामुळे भविष्यात भूखंडधारक रस्त्यावर येण्याचा धोका आहे. गावठाणबाहेरील सर्वे नंबरवर ग्रामसेवक परस्पर घर नंबर देत असल्याचा धक्कादायक प्रकारही घडत आहे.

वसमत - आसेगाव रस्त्यावरील बहुतेक सर्वे नंबरवर इंजीनगाव ग्रामपंचायतने नमुना नंबर आठला नोंदी घेतल्याचा प्रकार समोर येत आहे. गावठाणही बाहेरील सर्वे नंबरच्या आशा नोंदी घेण्याच्या प्रकाराने बनावट एनए ग्रामपंचायत एनए असे नाव देवून भूखंडधारकांना आकर्षित केले जात आहे. अशा ग्रामपंचायत एनएच्या वसाहतीसाठी नकाशावर ओपनस्पेस रस्ते दाखविले जातात. मात्र, ते प्रत्यक्षात शिल्लकच ठेवले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार आहे.

वसमत नगरपालिकेची हद्दवाढ झाली, तर अशा बनावट लेआऊटच्या वसाहती अडचणीत येणार हे स्पष्ट आहे. नगररचना कार्यालय हद्द वाढवताना विकासकामांसाठी आरक्षण कोणत्या सर्वे नंबरवर ठेवणार हे स्पष्ट नाही. ग्रीन झोन व आरक्षण जर सर्वे नंबरवर ठेवण्यात आले तर भूखंड खरेदी करणारे रस्त्यावरच येणार यात शंका नाही. कमी जागेत जादा भूखंड विकण्याचा मोह व एनएचा पैसा वाचवण्यासाठी घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना अडचणीत आणण्याचा हा जीवघेणा प्रकार आहे. या प्रकारास लगाम लावण्याची गरज आहे.

वसमत शहरातील काही जुन्या वसाहतीत घरे बांधल्यानंतर आता जागा मालकीवरुन वाद उभे राहिले आहेत. सातबारावर जमीन कायम असलेल्या मालकांनी किंवा वारसदारांनी दावा केला तर भूखंडधारकांना मालकी हक्क सिद्ध करणे अवघड जाणार आहे. वसमत - नांदेड रस्ता, परभणी रस्ता, आसेगाव रस्ता या रस्त्यांवर अधिकृत एनएन न करता उभ्या राहणाऱ्या वसाहतीचे भविष्य काय, हा प्रश्न आहे.

यासंदर्भात इंजनगावचे ग्रामविस्तार अधिकारी गोपीनाथ इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता, गावठाणबाहेरील सर्वे नंबरवर ग्रामपंचायतने नमुना नंबर दिले आहेत. फक्त ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढविण्यासाठीच त्याचा उपयोग आहे. तहसीलदारांनी नजीकच्या ग्रामपंचायतला नोंद घेण्यासाठीचे पत्र दिले होते. त्याच्या आधारावर नंबर दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Format the official NA layout in Wasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.