कळमनुरीत एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली चार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:25 PM2017-12-17T23:25:12+5:302017-12-17T23:25:28+5:30
तालुक्यातील शिवणी येथील तीन तर बाभळी येथील एक घर चोरट्यांनी १६ डिसेंबरच्या मध्यरात्री फोडून ५० ते ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील शिवणी येथील तीन तर बाभळी येथील एक घर चोरट्यांनी १६ डिसेंबरच्या मध्यरात्री फोडून ५० ते ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
शिवणी येथील रामराव हरण यांच्या घरात चोरट्यांनी गेटचे लॉक तोडून आत प्रवेश केला त्यांच्या घरातील ४ हजार रुपये नगदी लंपास केले. कपाट उघडत असताना हरण कुटूंबियांना जाग आली. आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले. त्यानंतर चोरटे यशवंतराव हरण यांच्या घरी गेले. त्यांच्या दरवाजाची कडी कोंडा काढून आत प्रवेश केला. त्यांचे नगदी १६ हजार व ३० हजाराची मन्याची पोत लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी माधवराव जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडले परंतु त्यांना तेथे काहीच सापडले नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बाभळीकडे वळविला. चोरट्यांनी माधवराव शिंदे यांचे चक्कीचे घर असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथेही त्यांना काहीच सापडले नाही. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली. पोनि जी.एस. राहिरे, रोहिदास राठोड यांनी घटनेची पाहणी केली व ठसेतज्ञ श्वानपथकाला पाचारण केले. श्वानाने पाणंद रस्त्यापर्यंत माग दाखविला. त्या दिशेने पोलीस प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. जिल्ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरीकांत भीतीचे वातारवण निर्माण झाले. चोरट्यांचे टोळके रात्री सक्रीय होत आहे.