आज जिल्हा रुग्णालयात मोफत कॅन्सर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:08+5:302021-05-31T04:22:08+5:30
संपूर्ण जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ‘तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान’ वसुंधरा विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत आहे. ३१ ...
संपूर्ण जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ‘तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान’ वसुंधरा विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत आहे. ३१ मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो. २०११-१६ पर्यंत घेण्यात आलेल्या २० (तोंड तपासणी) प्राथमिक कर्करोग मोफत तपासणी शिबिरात आतापर्यंत १ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ८३ लोक कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असल्याचे आढळल्याचे डॉ. फैसल खान यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत वसुंधरा टाटा ऑन बाइकची सुरुवात ३० सप्टेंबर २०१४ रोजी करण्यात आली. आतापर्यंत ५ गावांमध्ये तोंडाच्या तपासणी शिबिरात ५९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, तर ३००० पेक्षा अधिक लोकांना जनजागृती शिबिरात माहिती देण्यात आली. कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विज्ञान केंद्र व मुंबई टाटा हॉस्पिटलच्या वतीने २००१ ते २०१६ पर्यंत साधारणपणे १० शाळा व कॉलेजमधील साधारणपणे ५ हजार मुलांना तंबाखू व्यसनमुक्ती व कॅन्सरमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अभियानात डॉक्टर व कर्मचारी सहभागी होतात.
दंडनीय अपराधाचा विसर
१८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील व्यक्तीस विक्री करणे दंडनीय आहे. बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई, शैक्षणिक संस्थांच्या (शाळा, महाविद्यालय आदीच्या) १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनास मनाई, तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टणावर सूचना असणे गरजेचे (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/ नंतर ५ वर्षांनंतर कारावास व ५ हजारांपर्यंत दंड), तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी. (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/नंतर ५ वर्षांनंतर कारावास आणि ५ हजारांपर्यंत दंड.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
तोंडाचा कॅन्सर, मोतीबिंदू, घशाचा कॅन्सर, निकोटिनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य मंदावते, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर, श्वासाचा त्रास, यकृताचा कॅन्सर, हृदयविकार, पोटाचा अल्सर, पोटाचा कॅन्सर, नपुंसकत्व, रक्त न पोहोचल्याने हाताची बोटे गळून पडणे, रक्तवाहिन्या आकुंचित पावणे, वाढते पायाचे दुखणे, कार्यक्षमता मंदावणे, तसेच तोंडाला दुर्गंधी, दातांच्या समस्या, दात सडणे, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय आदी सर्व ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो, असे डॉ. फैसल खान यांनी सांगितले.