नोव्हेंबरपर्यंत मिळणार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थींना मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:54+5:302021-07-02T04:20:54+5:30
हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त ...
हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रतिमाह ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील ८ लाख ७१ हजार ७७६ पात्र सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे.
कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा सर्वांनाच थोडाअधिक फटका बसला असला तरी सर्वात जास्त झळा हातावर पोट असणाऱ्यांना बसल्या आहेत. हातचा रोजगार हिरावल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. मोफत धान्य मिळाल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी आर्थिक घडी बसण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शासनाने आणखी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत प्राधान्य कुटुंबासह अंत्योदय अन्न योजनेतील सदस्यांना प्रति सदस्य ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ३ किलो गहू तर २ किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नियतन मंजूर झाले असून या महिन्याचे अन्नधान्य ३१ जुलै पूर्वी उचलावे लागणार आहे.
महिन्याला मिळणार ४ हजार ३५८ मे.टन धान्य
जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२१ साठी मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यासाठी जुलै महिन्याचे ४ हजार ३५८ मे.टन धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात २ हजार ६१५ मे.टन गहू तर १ हजार ७४३ मे.टन तांदळाचा समावेश आहे. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेतील १ लाख ३७ हजार ६८४ लाभार्थी असून प्राधान्य कुटुंब योजनेतील ७ लाख ३४ हजार ९२ लाभार्थी आहेत.
अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्तचे मोफत
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या नियमित ३५ किलो अन्नधान्याचे अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरण केल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गंत शिधापत्रिकेतील प्रति सदस्याला ५ किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) मोफत वितरण केले जाणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना देखील अनुज्ञेय असलेल्या ५ किलो प्रति सदस्य अन्नधान्य वितरित केल्यानंतर प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्याचे मोफत वितरण केले जाणार आहे. रेशन दुकानदारांना मात्र ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरित करावे लागणार असल्याचे शासनाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी २९ जून रोजी जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.