होतकरु गरीब विद्यार्थ्यांना ‘आदर्श’मध्ये मोफत जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:44 AM2019-08-25T00:44:19+5:302019-08-25T00:44:44+5:30
जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. दररोजच्या जेवणाचा खर्चही पालकांना झेपावत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातून आलेल्या ३६ गरीब विद्यार्थ्यांचा वर्षभराचा जेवणाचा खर्च आदर्श महाविद्यालयाच्या वतीने उचलण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. दररोजच्या जेवणाचा खर्चही पालकांना झेपावत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातून आलेल्या ३६ गरीब विद्यार्थ्यांचा वर्षभराचा जेवणाचा खर्च आदर्श महाविद्यालयाच्या वतीने उचलण्यात आला आहे.
हुशार असतानादेखील आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे दोन वेळेचा जेवणाचा खर्चही उचलू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या महाविद्यालयात मोठी आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यात सोडून द्यावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी नुकतीच संस्थेचे सचिव रामचंद्र कयाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. आदर्श महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी २३ तर रामचंद्र कयाल यांनी १३ विद्यार्थ्यांचा खर्च उचलला. अशा एकूण ३६ विद्यार्थ्यांच्या वर्षभराचा जेवणाचा खर्च उचलण्याचा निर्णय झाला. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मेसला प्रत्येक महिन्याचा खर्च प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात येणार आहे. प्राध्यापक व कर्मचारी दर महिन्याला आपल्या पगारातून ५०० रुपये या उपक्रमासाठी देणार आहेत. मुलगा १४०० व मुलीसाठी ८०० रुपये प्रती महिन्याला देण्यात येणार आहे. शहरातील दानशुरांनी या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन आदर्श महाविद्यालयातर्फे केले आहे.
दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अर्थकरणावर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या खर्च झेपत नसल्याने हतबल झाले आहेत. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून टीसी काढण्यासाठी अनेक विद्यार्थी महाविद्यालयात येत असत. आदर्श महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही बाब संस्थेच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्यासाठी काय करता येईल, याविषयी नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात ३६ विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेचे सचिव राम कयाल यांनी सांगितले. बैठकीला प्राचार्य बी.डी. वाघमारे, उपप्राचार्य डॉ. विलास आघाव, प्रा. एल.एम. सामलेटी, ओ.एस. इंदाणी, डॉ. आर.आर. पिंपळापल्ले, डॉ. पी.टी. गंगासागरे, वर्षा सावतकर, प्रा. एस.एल. पराती, डॉ. पी.डी. आचोले, मेजर पंढरीनाथ घुगे आदी उपस्थित होते.
कयाल यांनी घेतली १३ विद्यार्थ्यांचा जबाबदारी
आदर्श महाविद्यालयाचे सचिव राम कयाल हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. यापूर्वी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी रेफ्रिजरेटरसह पाईपलाईन करुन दिली. तसेच जलेश्वर मंदिरास सभामंडपासाठी निधी दिला. यासह शहरातील विविध सामाजिक कार्यात मदतीसाठी त्यांचा पुढाकार असतो. या उपक्रमात त्यांनी सर्वात मोठा वाटा उचलला असून एकट्याने १३ विद्यार्थ्यांचा जेवणाचा खर्च उचलला आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.