फुकट्या प्रवाशांनो सावधान : तपासणीअंती भरावे लागेल दुप्पट भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:50+5:302021-09-27T04:31:50+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील तिन्ही एस. टी. आगाराच्या वतीने फुकट्या प्रवाशांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. रोज २० बस तपासल्या जात ...
हिंगोली : जिल्ह्यातील तिन्ही एस. टी. आगाराच्या वतीने फुकट्या प्रवाशांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. रोज २० बस तपासल्या जात असून ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
२२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम चालू राहणार आहे. यासंदर्भात तिन्ही आगारांना परभणी विभागाच्या वतीने पत्रही देण्यात आले आहे. जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. या मोहिमेत ६ पथक कार्यरत असून यासाठी ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये टीआय, एटीआय आणि वाहतूक निरीक्षकांचा समावेश आहे. जो प्रवासी फुकट प्रवास करीत असेल तर त्याला दुप्पट भाडे व १०० दंड भरावा लागेल, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.
एकूण आगार ०३
एकूण पथके ०६
तपासणी अधिकारी ०३
आतापर्यंत तरी दंड नाही...
एस. टी. महामंडळाने २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान फुकट्या प्रवाशांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. आजपर्यंत तरी एकाही फुकट्या प्रवाशावर कारवाई झाली नाही. जिल्ह्यातील वारंगा फाटा, हिंगोली, कळमनुरी, वसमत, रिसोड, सेनगाव, औंढा आदी ठिकाणी मोहीम सुरू केल्याचे महामंडळाने सांगितले.
...तर भरावे लागेल दुप्पट भाडे
जो प्रवासी तिकीट न काढता प्रवास करीत असेल, तर त्याने ज्या ठिकाणाहून तिकीट काढले आहे. तेथून तपासणी झाली तेथपर्यंतचे भाडे द्यावे लागणार आहे. म्हणजेच दुप्पट भाडे द्यावे लागणार आहे. उलट महामंडळाचा १०० रुपये दंडही भरणे त्यास अनिवार्य आहे.
प्रतिक्रिया
परभणी एस. टी. महामंडळा विभागाच्या वतीने तपासणी मोहीम सुरू केली आहे. सदरील तपासणी मोहीम ६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. कोणत्या वेळी आणि कुठेही बस थांबविली जाते. प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली