युतीसमोर आघाडीची अस्तित्वाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:36 PM2019-09-21T23:36:00+5:302019-09-21T23:36:31+5:30
जिल्ह्यात तीन मतदारसंघात तीन वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आहे. सर्व जिल्हाच आघाडीकडे असताना मागच्या निवडणुकीत युतीने दोन जागा हिसकावल्या होत्या.
विजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात तीन मतदारसंघात तीन वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आहे. सर्व जिल्हाच आघाडीकडे असताना मागच्या निवडणुकीत युतीने दोन जागा हिसकावल्या होत्या. आताही आघाडी उसने अवसान आणल्यासारखी लढायला निघाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात असून आता खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेना व भाजपची मंडळी तर गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहे. मात्र युतीच्या बोलणीत मिठाचा खडा पडावा, यासाठी देव पाण्यात घातले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागच्या विधानसभेला काँग्रेसची एक व राष्ट्रवादीची एक जागा हिसकावत अनुक्रमे भाजप व शिवसेनेने सत्ता मिळविली होती. यापैकी हिंगोलीत अजूनही त्याच परंपरागत राजकीय विरोधकांमध्ये लढतीची शक्यता आहे. विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे यांच्यासमोर काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर हेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुते यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांनी आघाडीत जागा मिळत नसल्याने नाद सोडला आहे. निदान त्यांच्यामुळे कुणीतरी भाजपसमोर आव्हान उभे करीत असल्याचे दिसत तरी होते. मात्र युती न झाल्यास सेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर व रामेश्वर शिंदे यांच्यापैकी कुणीतरी रिंगणात राहण्याची शक्यता आहे. मुटकुळे यांना एवढ्या कमी दिवसांत तगडे आव्हान देण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. वसमतलाही राजू पाटील नवघरे या नवख्या उमेदवारापेक्षा जयप्रकाश दांडेगावकर व डॉ.जयप्रकाश मुंदडा या दोन अनुभवी दिग्गजांतच टक्कर रंगणार आहे, असे दिसत आहे. हे परंपरागत प्रतिस्पर्धी आपापल्या परीने तयारीलाही लागले आहेत. युती न झाल्यास भाजपचे शिवाजी जाधव रिंगणात राहण्याची चिन्हे असून त्यांची अपक्ष म्हणूनही तयारी आहे. त्यामुळे येथे शिवसेनेला बंडखोरीचा त्रास सोसावा लागू शकतो.
कळमनुरीत काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांच्यासमोर शिवसेनेचे संतोष बांगर यांचे आव्हान राहणार की ही जागा रासपला सुटणार या चर्चा अजून संपल्या नाहीत. युती न झाल्यास संतोष बांगर हे उमेदवार राहतील, यात कोणतीच शंका नाही, असे सेनेच्या गोटातून सांगितले जात आहे. तर रासपला जागा सुटल्यास मागच्या वेळचे पराभूत गजानन घुगे की विनायक भिसे यावरही चर्चा रंगत आहे. या मतदारसंघात वंचितकडूनही दिग्गज उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यामुळे बहुरंगी लढत होवू शकते.
भाजप नेत्यांची लागणार
प्रतिष्ठा पणाला
भाजपच्या नेतेमंडळींनी लोकसभेच्या दृष्टीने पक्षवाढीसाठी जमेल तशी इतर पक्षातील मंडळी आपल्याकडे खेचून घेतली. काही जण मागच्या विधानसभेलाच गळाला लागले होते. त्यानंतर काहींनी लोकसभेपूर्वीच पक्ष सोडला. जे राहिले ते आता विधानसभेची आस धरून आहेत. मात्र युती झाली तर या मंडळीचे करायचे काय? हा गंभीर प्रश्न आहे. वसमत, कळमनुरीत ही मंडळी बंडाळी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपसमोर हा मोठा पेचप्रसंग असून त्यांना थोपविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. तरीही ते रिंगणात राहिले तर युतीच्या विश्वासाला तडा जाणार आहे. यावर आता भाजप कोणता रामबाण उपाय शोधणार? हा प्रश्न आहे.
अपक्षांची संख्या वाढणार
विधानसभा निवडणुकीची तयारी करणारे अनेकजण होते. चाचपणी करूनही कोणताच पक्ष दारात उभा करीत नसल्याने आता ही मंडळी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करीत आहे. प्रत्येक मतदारसंघात अशा मंडळीचा यावेळी टक्का वाढणार आहे.
सातवांची कसोटी
लोकसभा निवडणुकीत गुजरात राज्याच्या जबाबदारीमुळे न लढलेले खा.राजीव सातव यांचे स्थानिक नेत्यांशी असलेले मतभेद उघड होते. यावेळी ते काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी आहेत. त्यामुळे आघाडीत समन्वय निर्माण करून या जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. काहींचा तर अबोलाच असल्याने हे कसे साधणार? हा प्रश्नच आहे. ही जबाबदारी पेलणे कसोटीचे आहे.
राष्ट्रवादीसमोर आव्हान
जिल्ह्यात काँग्रेसने तरी मागच्या वेळी कळमनुरीच्या रुपाने एक जागा राखली होती. तर भाजपने आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या तर सेनेने डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या रुपाने पुन्हा खाते उघडले. राष्ट्रवादीने जयप्रकाश दांडेगावकर यांची एकमेव जागाही गमावली. ती पुन्हा मिळविणे हे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह आ.रामराव वडकुते यांच्यासमोर आव्हान आहे.
‘वंचित’चे काय ?
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार हवा निर्माण केली. तिन्ही मतदारसंघात तीस हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यामुळे अनेक दिग्गजांनी वंचितच्या मुलाखतींसाठी हजेरी लावली होती. अजूनही वंचितचे चेहरे समोर आले नाहीत. मात्र योग्य उमेदवार दिला तर सर्वच पक्षांच्या तोंडाला फेस येवू शकतो. मागच्या निवडणुकीत आघाडी व युतीत थेट लढती होत्या. तसे झाले तर वंचितमुळे आघाडीचे नुकसान होईल. मात्र विभक्त लढल्यानंतर वंचितही स्पर्धेत येण्याची भीती आहे.
मागच्या निवडणुकीत हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मताधिक्यापेक्षा नजीकच्या स्पर्धकाला कमी मते होती. तर मुंदडा व दांडेगावकर यांच्यातील मतांचा फरक अवघा साडेपाच हजारांचा होता.
युती होणार की नाही होणार, हा प्रश्न जेवढा गहन तेवढाच शिवसेनेची उमेदवारी कुणाला मिळणार? हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या अफवांमुळे शिवसेनेने बाहेरचा उमेदवार देण्याची परंपराच निर्माण करण्याचा चंग बांधला की काय? असा सवाल आता शिवसैनिकच करू लागले. लोकसभेला नांदेडचा, विधान परिषदेला अकोल्याचा उमेदवार दिला. विधानसभेला दुसºया पक्षातून घेवून देणार की काय? असा सवाल केला जात आहे. याचे उत्तर उमेदवारी जाहीर झाल्यावरच मिळणार आहे. यावेळी तसे झाल्यास शिवसैनिक वेगळ्या वाटेने जाण्याची शक्यता आहे.