मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच पाण्याचे मडके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:24 AM2019-05-07T00:24:18+5:302019-05-07T00:24:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : शहरात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला चार दिवसांआड दहा मिनिटेच पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शहरात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला चार दिवसांआड दहा मिनिटेच पाणी येत असल्याने संतप्त आंदोलक महिलांनी नगरपंचायतीत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोरच मडके फोडून संताप व्यक्त केला.
नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. याकडे मात्र नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची ओरड सुरु आहे. सोमवारी प्रभाग क्रमांक १५ महिलांनी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. तर यावेळी महिला एवढ्या संतप्त झाल्या होत्या की, महिलांनी अक्षरश: मुख्याधिकाºयांच्या कक्षासमोरच रिकामे पाण्याचे मडके फोडले. त्यानंतर निवेदन दिले. यापुढे जर सुरळीतपणे पाणी नळाला नाही सोडले तर आंदोलन अधिक तीव्र करून घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी नगरपंचायतला दिला आहे.
प्रभाग क्रमांक ७ व १५ या प्रभागात नळाला सुरळीत पाणी येत नाही. त्यामुळे मोर्चात महिला हंडे घेऊन हजर झाल्या.
या निवेदनावर नगरसेवक सुमेध मुळे, लक्ष्मी काळे, पार्वती देशमुख, छाया तोंडे, निर्मला राऊत, राजाबाई पालक, सुनिता गोरे, शेख अजनबी, चंद्रकला राऊत, प्रल्हाद काळे, भगवान देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, पवन राऊत, प्रल्हाद पालक आदींच्या स्वाक्षºया आहेत. लवकरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. नळाला सात दिवसांत केवळ दहा मिनिटेच पाणी येते. त्यामुळे पाणी दोन दिवसही पुरत नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करू - चौंढेकर
शहराला सध्या दोन दिवस आड पाणी देण्यात येत आहे, परंतु विद्युतपंप जळाल्याने पाणी टाकीमध्ये आले नाही. त्यामुळे प्रभागात पाणी जायला उशीर झाला आहे. यानंतर औंढा तलावातून नवीन पूरक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे पाणीपुरवठा सुरळीत होईल. असे नगराध्यक्षा सविता चौंढेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.