जिल्ह्यातील १५ ग्रा.पं.ला इमारतीसाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:37 AM2018-09-28T00:37:30+5:302018-09-28T00:37:46+5:30

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने तसा अहवाल जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविला होता. टप्प्या-टप्प्याने निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले.

 Fund for the building of 15 gram panchayat in the district | जिल्ह्यातील १५ ग्रा.पं.ला इमारतीसाठी निधी

जिल्ह्यातील १५ ग्रा.पं.ला इमारतीसाठी निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने तसा अहवाल जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविला होता. टप्प्या-टप्प्याने निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे स्मृति मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत हा निधी मिळाला आहे. शासनाने मागील वर्षी ज्या ग्रामपंचायतींना इमारती नाहीत, अशांबाबत अहवाल मागविला होता. त्यात जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींची यादी पंचायत विभागामार्फत पाठविण्यात आली होती. यात औंढा तालुक्यात सर्वाधिक २६ ठिकाणी ग्रामपंचायतींना इमारत नसल्याची बोंब आहे. त्यानंतर कळमनुरी १८, वसमत १३, हिंगोली-१२ व सेनगाव तालुक्यात १0 ठिकाणी ग्रामपंचायतीची स्वत:ची इमारत नाही. यातही एक हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख तर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख रुपये देण्यात येणार होते. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडे स्वत:च्या मालकीची जागा, दहा टक्के लोकवाटा भरण्याची तयारी असणे आवश्यक होते. वरील ७९ ग्रामपंचायती यासाठी राजी असल्याने त्यांचा अहवाल पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात १२ लाखांचा निधी अपेक्षित असलेल्या ग्रामपंचायतींनाच निधी प्रदान करण्यात येत आहे. त्यातही टप्प्या-टप्प्याने मंजुरी मिळत असून १५ ग्रा.पं.ना तो मिळाला आहे.
यात औंढा तालुक्यातील गढाळा, जोडपिंप्री व फूलदाभा येथील ग्रा.पं.ला प्रत्येकी १२ लाखांच्या निधीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. तर यापूर्वी औंढा तालुक्यातील नांदखेडा, चिमेगाव, काठोडा, वगरवाडी तांडा, बेरुळा, पेरजाबाद या गावांना निधी मिळाला आहे. कळमनुरी तालुक्यातील आडा, येगाव, रेणापूर तर हिंगोली तालुक्यातील चिंचाळा, बोंडाळा, जांभरुन तांडा या गावांना निधी मिळाला आहे. यात औंढा ९, हिंगोली-३ व कळमनुरी ३ अशी १५ गावे आहेत. या गावांना १.८0 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या गावांत नव्याने ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम होणार असून गावरहाटीचा कारभार यातून हाकला जाणार आहे.

Web Title:  Fund for the building of 15 gram panchayat in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.