‘त्या’ मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:59 PM2018-12-25T23:59:43+5:302018-12-25T23:59:58+5:30
अवघे २७ ते ३० वर्षे वयाची महिला.. तिची जीवनयात्रा संपली. ओळखही पटत नव्हती अन् नातेवाईकही मिळत नव्हते. अखेर बाळापूरकरांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : अवघे २७ ते ३० वर्षे वयाची महिला.. तिची जीवनयात्रा संपली. ओळखही पटत नव्हती अन् नातेवाईकही मिळत नव्हते. अखेर बाळापूरकरांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलमंडळ शिवारातील कॅनॉलमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह कचऱ्यात अडकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला बाहेर काढून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सदर महिलेचे अंगावरील कपडे व ठेवण मुस्लिम समाजातील असल्याची दिसून आले. हा मृतदेह कधीपासून अडकून होता हे माहीत नाही. परंतु तो २२ तारखेला सापडला. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा खूप शोध घेतला. परंतु ओळख पटली नाही. पाण्यातील लाकडांमध्ये अडकलेला मृतदेह कुजला होता. शवविच्छेदन बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात केले. नातेवाईक सापडत नाहीत, मृतदेहाची ओळख पटत नाही अशा वेळी काय करावे? हा प्रश्न आरोग्य व पोलीस प्रशासनाला पडला. अखेर बिट जमदार सपोउपनि नागनाथ दीपक, आखाडा बाळापूरचे बीट जमदार संजय मार्के यांनी पुढाकार घेऊन या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. त्यांनी ग्रामपंचायतीला नोटीस देऊन दफनविधी करण्याबाबत सांगितले. ग्रा.पं. कर्मचारी बाबूराव गृहपाल व शेख जमीर शे. नजीर हे आले. सोबत बाळापूरचे सामाजिक कार्यकर्ते जाहेब खान नूर खा. पठाण, तय्यब खा. मुनीर खा., मोबीन असद कादरी, सय्यद इम्रान स. सुलतान, सर्वर कुरेशी बिलाल कुरेशी, शेख मुनीर शे. नजीर, शेख इरफान शे. इमाम, अब्दुल खदिर शे. मुनीर, शेख कलीम शे. जमीर यांच्यासह अनेक नागरिक पुढे आले. सदर बेवारस मृतदेहांवर बाळापूरवाडी येथील कब्रस्तानमध्ये धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार करण्यात आले. मौलाना हाफिज हलीम यांनी नमाज पढला. बाळापूर पोलीस आणि नागरिकांनी माणुसकीचा गहिवर दाखवत या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.