शहीद संतोष चव्हाण यांच्यावर ४८ तासांनंतर अंत्यसंस्कार; हजारो नागरिकांनी दिली मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:06 PM2019-05-03T17:06:48+5:302019-05-03T17:19:24+5:30
गडचिरोली येथे हल्ल्यात संतोष चव्हाण शहीद झाले
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा जंगलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १ मे रोजी शहीद झालेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील संतोष चव्हाण यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल ४८ तासानंतर पार्थिव कुटूंबियांच्या स्वाधीन केल्याने कुटुंबियांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
गडचिरोली येथे गुरूवारी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्यातील १५ पोलीस जवानांना अखेरची श्रद्धांजली वाहिल्यानंतर पार्थिव तेथून सायंकाळी ५ वाजता रवाना केले. शुक्रवारी सकाळी पार्थिव औंढा शहरात दाखल झाले. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हजरो नागरिकांनी शहीद चव्हाण यांच्या पार्थिवाची शहरातील मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा काढली. यावेळी शहरातील महिला, बालकांसह सर्वच जण श्रद्धांजली देण्यासाठी रस्त्यावर हजर होते. त्यानंतर ब्राम्हणवाडा येथे पार्थिव नेण्यात आले. येथेही ग्रामस्थांनी रस्त्या-रस्त्यावर रांगोळी काढून शहीद चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. सकाळी ९ वाजता शहीद चव्हाण यांच्या घरी पार्थिव नेण्यात आले. येथे कुटूंबातील आई-वडील, पत्नी, बहिणी व अन्य नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेतले. यानंतरगावातून अंत्ययात्रा काढून चव्हाण यांच्या शेतात अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस आणि हजारोंच्या जनसमुदायाने त्यांना मानवंदना दिली.