Ganeshotsav 2022 : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद
By यमेश शिवाजी वाबळे | Published: September 9, 2022 02:16 PM2022-09-09T14:16:41+5:302022-09-09T14:18:13+5:30
Ganeshotsav 2022 : नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोलीचा चिंतामणी सर्वदूर प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी मोदकोत्सव घेण्यात येतो.
हिंगोली - राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोली येथील श्री चिंतामणी गणपती मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत हजारो भाविकांनी चिंतामणीचे दर्शन घेतले. तर भाविकांच्या रांगा दर्शनासाठी कायम आहेत.
नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोलीचा चिंतामणी सर्वदूर प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी मोदकोत्सव घेण्यात येतो. या उत्सवाला महाराष्ट्रसह परराज्यातील भाविक दर्शनासाठी व नवसाचा मोदक घेण्यासाठी येतात. कोरोनामुळे दोन वर्ष मोदकोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे हा उत्सव अनंत चतुर्दशीला ९ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडत आहे.
आज, अनंत चतुर्दशीला पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत हजारो भाविकांनी चिंतामणीचे दर्शन घेतले. तर दूरवरून भाविक दर्शनासाठी येत होते. इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, गणपती चौक रांगा लागल्या होत्या. दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर संस्थान, पोलीस, नगर पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. रांगेत भाविकांना फराळ, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे.