ट्रकचालक झोपेत असताना केबिनमध्ये घुसून लुटणारी टोळी उघडकीस; चोरट्यांकडून २१ मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 04:55 PM2021-02-03T16:55:43+5:302021-02-03T17:00:18+5:30

हिंगोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात अनेक ट्रकचालक हे रात्रीला ढाब्यावर ट्रक लावून केबिनमध्ये झोपतात.

A gang of robbers robbed a truck driver who was sleeping on a Dhaba; 21 mobile phones seized from thieves | ट्रकचालक झोपेत असताना केबिनमध्ये घुसून लुटणारी टोळी उघडकीस; चोरट्यांकडून २१ मोबाईल जप्त

ट्रकचालक झोपेत असताना केबिनमध्ये घुसून लुटणारी टोळी उघडकीस; चोरट्यांकडून २१ मोबाईल जप्त

Next
ठळक मुद्देट्रकचालक झोपेत असताना केबिनमध्ये घुसून त्यांच्या मोबाईलसह इतर किमती साहित्य लांबविणारी टोळीपोलिसांनी ३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या २१ मोबाईलसह १ हजार रुपये जप्त केले

हिंगोली : धाब्यावर ट्रक लावून मुक्कामी केबिनमध्ये झोपलेल्या ट्रकचालकांना लुटणाऱ्या लुटारूंचा शोध घेत त्यांच्याकडून २१ मोबाईलसह सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच केली. या लुटारूंकडून चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात अनेक ट्रकचालक हे रात्रीला ढाब्यावर ट्रक लावून केबिनमध्ये झोपतात. ट्रकचालक झोपेत असताना केबिनमध्ये घुसून त्यांच्या मोबाईलसह इतर किमती साहित्य लांबविणारी टोळी सक्रिय झाली होती. ट्रकचालक व क्लिनर यांचा मोबाईल व पाकीट चोरीला गेल्याची फिर्याद कुरूंदा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. याच वेळी ट्रकचालकांना लुटणारी टोळी भेंडेगाव (जि. नांदेड) येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घेवारे यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक तयार करून रवाना करण्यात आले. तेथे सोनखेड पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी माधव किशन भोसले (रा. भेंडेगाव, ता. लोहा) यास ताब्यात घेतले. चोरीच्या घटनांबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने धाब्यावर, पेट्रोलपंपावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकचालकास लुटल्याची कबुली दिली, तसेच त्याचा भाऊ वैभव किशन भोसले, विलास रमेश शिंदे (रा. वसमत) हेही चोरीच्या घटनेमध्ये सहभागी असून, चोरलेले मोबाईल गावातील काही लोकांना विकल्याचेही त्याने सांगितले.

३ लाख १५ हजार किमतीचे मोबाईल
दरम्यान, या पथकाने माधव किशन भोसले यास ताब्यात घेऊन ३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या २१ मोबाईलसह १ हजार रुपये जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीस कुरूंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, पोहेकाँ. संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, सायबर सेलचे जयप्रकाश झाडे, नीलेश हालगे, चालक प्रशांत वाघमारे, शेख जावेद यांच्या पथकाने केली.

Web Title: A gang of robbers robbed a truck driver who was sleeping on a Dhaba; 21 mobile phones seized from thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.