'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 04:25 PM2021-09-28T16:25:29+5:302021-09-28T16:26:51+5:30
rain in Hingoli : रौद्ररुप धारण केलेल्या नदीमातेला शांत करण्यासाठी ' बोळवण ' करण्याची परंपरा....
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : गेल्या चार दिवसापासून दुथडी भरून वाहणाऱ्या कयाधू नदीने आज रौद्ररूप धारण केले असून परिसरातील सर्व शेती पुराखाली गेली आहे. नदीचे हे विक्राळ रूप शांत करण्यासाठी डोंगरगाव पूल येथील महिलांनी नदीची साडीचोळी, खणा-नारळाने ओटी भरून पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे म्हणत नदीला मनोभावे पूजत हे संकट दूर करण्यासाठी विनंती केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असून काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरू आहे .या पावसामुळे परिसरातील नदी,नाले ,ओढे ,तुडुंब भरून वाहत असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरून वाहणारी कयाधू नदी काल रात्री तीन वाजल्यापासून महापुराच्या रुपात आहे. नदीला महापूर आला असून परिसरातील शेती पुराखाली गेली आहे. सोयाबीनचे, हळदीचे, कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर कमी होईल या आशेवर नदीकाठच्या गावातील लोक बसले होते . परंतु वरचेवर पुराचे पाणी वाढत आहे. बाळापुर नजीक डोंगरगाव पूल येथे नदीने विक्राळ रूप धारण केले आहे.
Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण
नदीमधील मंदिराचा कळस बुडत असून त्याचा झेंडा बुडला की राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद होतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा महापूर शांत व्हावा यासाठी डोंगरगाव येथील महिलांनी नदीची मनोभावे पूजा केली. साडी, चोळी, खारीक खोब-याचे, तांदूळ, हळदीचे कोंब हे साहित्य वाहून नदीची मनोभावे पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे साकडे घातले आहे. ' विक्राळ रूप शांतकरून परिसरात समृद्धी नांदू दे...' असे मागणे यावेळी डोंगरगाव पूल येथील सुनीता क्षीरसागर, संगीता पावडे या महिलांनी पुराच्या पाण्यात पूजा करून केली. तर गावातील सिताराम परसराम शिरफुले यांनी साडी चोळी पुराच्या पात्रात नेऊन सोडली.
नदी मुलीचे प्रतिक
नदीने रौद्ररूप धारण करून परिसरात नुकसान सुरु केले की नदीला शांत करण्यासाठी तिची बोळवण केली जाते. गंगा ही मुलीसमान असून मुलगी रागावली की तिला शांत करण्यासाठी तिची बोळवण करतात अशी प्रथा या नदीकाठच्या गावांमध्ये आहे .आज नदीला महापूर आल्यामुळे तिला शांत करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये अशा पद्धतीची पूजा सुरू झाली आहे.
गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली