नांदेडहून ऑटोतून आणलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: November 10, 2023 04:41 PM2023-11-10T16:41:25+5:302023-11-10T16:42:11+5:30
अडीच लाखांच्या गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली : नांदेड येथून एका ऑटोतून आलेला अडीच लाख रूपये किमतीचा १० किलो ६२ ग्रम गांजा स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई १० नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
नांदेड येथून एका ऑटोतून गांजा आणला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे नांदेड नाका येथे सापळा लावला. या वेळी एमएच २६ बीडी ४५३५ क्रमांकाचा ऑटो येत असल्याचे पथकाला दिसले. पथकाने ऑटो चालकास वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन थांबवून नाव गाव विचारले असता त्याने शेख युनूस शेख सलीम (रा. इतवारा नांदेड) असे सांगितले.
ऑटोची तपासणी केली असता ऑटोत अडीच लाख रूपये किमतीचा १० किलो ६२ ग्रम गांजा आढळून आला. हा गांजा नांदेड येथील एकाच्या सांगण्यावरून विक्रीस आणला असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी गांजा व ऑटो असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोन यांच्या फिर्यादीवरून शेख युनूस शेख सलीम व अन्य एकाविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, शंकर ठोंबरे, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली.