औंढा व वसमत तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:15 PM2018-11-10T12:15:13+5:302018-11-10T12:16:24+5:30
औंढा व वसमत तालुक्यातील काही गावात दोन दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.
हिंगोली : औंढा व वसमत तालुक्यातील काही गावात दोन दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. शुक्रवारी दुपारी 2.6 रिश्टर स्केल अशा सौम्य भूकंपाची नोंद लातूर येथील भूकंप मापक यंत्रावर झाली असून आज पहाटे चार वेळा असेच धक्के जाणवले आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील नानंदापुर, पिपळदरी, आमदरी, सोनवडी, राजदरी, जामगव्हाण व वसमत तालुक्यातील शिंदे पांगरा, वापटी, कुपटी शिरली या गावात शुक्रवारी दुपारी 1: 37 वाजताल जमिनीतून मोठा आवाज होऊन भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यानंतर आज पहाटे 5:40, 5:42, 5:47 व 7:57 वाजता असाच आवाज झाला. यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने या प्रकारावर लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या आवाजाची लातूर येथील भूकंप मापन केंद्रात 2.6 रिश्टर स्केल अशी नोंद झाली आहे.