लग्नाची मागणी अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:23 PM2018-11-10T15:23:19+5:302018-11-10T15:24:57+5:30
लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची युवकाच्या नातेवाईकाने मारहाण करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दाताडा( बु ) येथे शुक्रवारी (दि.९ ) घडली.
सेनगाव (हिंगोली ) : लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची युवकाच्या नातेवाईकाने मारहाण करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दाताडा( बु ) येथे शुक्रवारी (दि.९ ) घडली. कैलास माणिकराव शिंदे (४५) असे मृताचे नाव असून या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाताडा (बु) येथील कैलास माणिकराव शिंदे यांच्या मुलीस गावातीलच सचिन नारायण सुरनर याने लग्नाची मागणी घातली. परंतु, शिंदे यांनी सचिन व्यसनाधीन असल्याने लग्नाचा प्रस्ताव अमान्य केला. लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने समाजात आपली बदनामी झाली असा राग मनात धरून सचिन व त्याच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शिंदे यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या पोटात चाकूचे वार केले. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना वाचविण्यासाठी त्यांचा भाऊ भुजंग गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.
गंभीर जखमी शिंदे व त्यांचे भाऊ भुजंग यांना उपचारासाठी हिगोली येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान कैलास शिंदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात मृताचा मुलगा अमोल माणिक शिंदे याने फिर्याद दिली. यावरून सचिन सुरनर, किरण सुरनर, नितीन कवडे, विश्वनाथ कवडे, गणेश कवडे या पाच जणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार बाबुराव जाधव हे करत आहेत.