‘एक करोड दे, नही तो गोली मार देंगे’; व्यापाऱ्यास खंडणी मागणारा निघाला दुकानातीलच मजूर
By विजय पाटील | Published: April 11, 2024 04:38 PM2024-04-11T16:38:48+5:302024-04-11T16:39:17+5:30
दुकानात काम करणाऱ्यानेच रचला गेम, पोलिसांनी धमकी देणाऱ्यास केली अटक
हिंगोली : मोबाइलवर कॉल करून ‘एक करोड दे दो, नहीं तो गोली मार के ठोक देंगे’, अशा वारंवार धमक्या देत एका व्यापाऱ्यास गंडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यास हिंगोली पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांत दहशत निर्माण झाली होती.
वसमत येथील कापड व्यावसायिक मनोज दत्तात्रय दलाल यांना दि. ७ एप्रिल रोजी एका अनोळखी मोबािल क्रमांकावरून व्हॉट्स ॲपवर कॉल आला. यावर संबंधिताने त्यांना धमकी दिली. एक कोटी खंडणी दे दो नही तो गोली मारके ठोक देंगे. हा प्रकार वारंवार घडत होता. त्यामुळे त्यांना वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. याबाबत गुन्हा दाखल केला. या प्रकाराची दखल घेत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, वसमतचे कुंदनकुमार वाघमारे यांना तपासाच्या सूचना दिल्या.
यात खंडणी मागणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तो स्वीच ऑफ असल्याचे आढळून येत होते. त्यामुळे पोलिसांनी या मोबाइल क्रमांकाची इतर माहिती मिळविली. त्यावरून मूळ नाव, गाव, पत्ता आदी प्राप्त करण्यासाठी सायबर सेलचे एक विशेष पथक नेमण्यात आले. त्यानंतर अवघ्या बारा तासांत आरोपी जेरबंद केला. सपोनि महादेव मांजरमकर, राजेश मलपिलू, शिवसांब घेवारे, फौजदार विक्रम विठुबोने, कर्मचारी दीपक पाटील, दत्तात्रय नागरे, इरफान पठाण, राजू गुठ्ठे, प्रभू मोकाडे, डी. जी. मात्रे, शेख बाबर, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे आदींनी ही कामगिरी पार पाडली.
तांत्रिक विश्लेषणातून समोरी आली बाब
सायबल सेलने केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून हा मोबाइल क्रमांक राजस्थानमधील बलोतरा जिल्ह्यातील पचपदरा ताालुक्यातील मुसलमानका वास या गावातील वेल्डिंग व्यावसायिक महेबूब खान अब्दुल खान याचा असल्याचे समोर आले. त्यामुळे जी. श्रीधर यांनी बलोतराचे पोलिस अधीक्षक कुंदन कवरिया यांना या आरोपीचा पत्ता पाठवून आरोपी पकडण्यासाठी मदत मागितली. वसमत शहर ठाण्याचे पथकही राजस्थानला रवाना केले. आरोपी महेबूब खान यास ताब्यात घेऊन हिंगोलीत आणले. त्याला विचारपूस केली असता खळबळजनक माहिती समोर आली.
दुकानात काम करणाऱ्याचाच होता गेम
महेबबूला मनोज दलाल यांच्या दुकानात काम करणाऱ्या कृष्णा तुकाराम बेंडे (वय १९, रा. पळशी, ता. वसमत) यानेच त्याचा गावातील ऑटोचालक मित्र ज्ञानेश्वर तुकाराम गाडगे (वय २३, ऑटोचालक) याने कामाला लावले होते. गाडगेच्या सांगण्यावरून महेबूब दलाल यांना गोळी मारण्याची धमकी देऊन एक करोड रुपये मागत होता. या तिघांनीच हा प्लॅन आखल्याचे समोर आले.