अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, लवकरच पाेलीस भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:55+5:302021-07-19T04:19:55+5:30
हिंगोली : राज्यातील पोलीस दलातील सध्याचे मनुष्यबळ लक्षात घेता, १२ हजार ५०० जागा भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. प्रत्येक ...
हिंगोली : राज्यातील पोलीस दलातील सध्याचे मनुष्यबळ लक्षात घेता, १२ हजार ५०० जागा भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून रिक्त जागा व रोष्टरनुसार भरतीबाबत माहिती घेतली जात असून, पुढील काही दिवसांतच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी हिंगाेली येथे आले असता दिली.
हिंगाेली येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, राजू चापके, राम कदम, दिलीप बांगर आदींची उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, राज्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला जात आहे. त्यामुळे लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून रिक्त जागा, रोष्टरनुसार जागा, राखीव जागांची माहिती घेतली जाणार आहे. या माहितीचे संकलन झाल्यानंतर प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.
राज्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, तसेच नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्नही आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत १ लाख २५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कमी आले आहे. उपलब्ध निधी, कर्मचाऱ्यांचे वेतन, तसेच कोरोनावर झालेला खर्च, यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर आल्यानंतर सर्व प्रश्न सोडविले जातील, असेही त्यांनी सांगितले.