कळमनुरी तालुक्यात पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे एप्रिल महिन्याचे उद्दिष्ट अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:39 PM2018-05-06T23:39:48+5:302018-05-07T12:43:23+5:30
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१७-१८ या वर्षात फक्त पाचच पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. एप्रिल महिन्यात एकही पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली नाही.
कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१७-१८ या वर्षात फक्त पाचच पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. एप्रिल महिन्यात एकही पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली नाही.
२०१७-१८ या वर्षात १३९ पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु आतापर्यंत फक्त पाचच म्हणजे साडेतीन टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. आखाडा बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ तर पोत्रा येथे १ अशा एकूण ५ पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. दोन अपत्यावर फक्त दोन पुरूषांनीच ही शस्त्रक्रिया करून घेतली. पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत चांगलीच उदासीनता दिसून येत असून याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पुरूषांना १४५१ रुपये मानधन दिले जाते. महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्यास फक्त २५० अथवा ६०० रुपये मानधन दिले जाते.
पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करूनही प्रतिसाद मिळत नाही. याबाबत आमच्या माध्यमातून जनजागृती केल्या जाते, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश कत्रुवार यांनी सांगितले. दरवर्षीच पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी प्रतिसाद मिळत नाही. पुरूष शस्त्रक्रियेचे येथील ग्रामीण रुग्णालयाला २१, प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूरला २८, डोंगरकडा- २०, पोरा १६, मसोड २१, रामेश्वर तांडा १८, वाकोडी १५, असे एकूण १३९ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु आखाडा बाळापूर व पोत्रा वगळता कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत.