जिल्ह्याच्या इतिहासात कोरोना लसीकरणाची सुवर्ण अक्षरांनी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:10+5:302021-01-17T04:26:10+5:30

हिंगोली : जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होत असलेल्या कोरोना लसीकरणाची जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यात येईल, असे प्रतिपादन ...

Golden letters record of corona vaccination in the history of the district | जिल्ह्याच्या इतिहासात कोरोना लसीकरणाची सुवर्ण अक्षरांनी नोंद

जिल्ह्याच्या इतिहासात कोरोना लसीकरणाची सुवर्ण अक्षरांनी नोंद

Next

हिंगोली : जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होत असलेल्या कोरोना लसीकरणाची जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय परिचारिका महाविद्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गित्ते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. प्रेमकुमार ढोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे, तालुक आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुनवाल, डॉ. नामदेव कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, जिल्ह्यात कोविड-१९ या प्रादुर्भावाबाबत हिंगोली जिल्ह्यात सर्वप्रथम १४ फेब्रुवारी २०२० रोजी जनजागृतीपर सभा घेण्यात आली. या सभेत कोविड-१९ या साथरोगाला लढा देण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. या रणनीतीचा आजचा पुढचा टप्पा म्हणजे ही लसीकरण मोहीम असून, प्रशासनाने योग्य नियोजन करून आखलेली रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.

जिल्ह्यात कोविड-१९ या साथरोगाविरुद्ध लढा देताना प्रत्येक विभागाचे योगदान हे खूप मौल्यवान असून, आरोग्य विभागाने स्वत:चा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र मेहनत केली. त्यांचे योगदान हे अमूल्य आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करून या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समान समावेश या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले.

जिल्ह्यात लसीकरणाबाबतचे सूक्ष्म व योग्य नियोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यास एकूण सहा हजार ६५० लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. याद्वारे एकूण तीन हजार ३३२ ‘कोविन ॲप’वर नोंद केलेल्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्हा रुग्णालयातील शासकीय परिचारिका महाविद्यालयात आयोजित आरोग्य विभागातील १०० कर्मचारी, तर उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी येथे आयोजित आरोग्य विभागातील १०० कर्मचारी असे एकूण २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरणाविषयी कसलीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले.

प्रास्ताविक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले. यावेळी कोविड-१९ लसीकरण मोहिमेची प्रथम लस वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे यांना देण्यात आली, तर शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या रमा गिरी यांना प्रथामिक स्वरूपात दुसरी, तर महिलांमध्ये प्रथम लस देण्यात आली.

लसीकरणाचे पहिले लाभार्थी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे यांनी यावेळी लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाला नसून, स्वत:ला संरक्षित वाटत असून, सर्वांनी ही लस घेऊन स्वत: आणि इतरांना संरक्षित करावे, असे आवाहन केले.

सेल्फी स्टॅंडचे उद्घाटन

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ‘मी कोरोनाची लस घेतली, तुम्हीही घ्या’ या सेल्फी स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Web Title: Golden letters record of corona vaccination in the history of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.