होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:34+5:302021-07-03T04:19:34+5:30
हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून ...
हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी कोरोना महामारी ही अजून संपलेली नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे.
करोना महामारीची तिसरी लाट समोर ठेवूनच मंगल कार्यालयांनाही काही अटी घातल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमाचे पालन केले नाही तर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असल्यामुळे बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये विवाह मुहूर्त २१ आहेत. त्यामुळे दागिने करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी होऊ लागली आहे.
...या असतील अटी
विवाह कार्य करण्यासाठी अनेक जण मंगल कार्यालय राखीव करतात. परंतु मंगल कार्यालयांना जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे. मंगल कार्यालयात मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. याचबरोबर वर-वधू पित्यांना वऱ्हाडी मंडळींसाठी मास्क खरेदी करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे ५० वऱ्हाडी मंडळींनाच मंगल कार्यालयात परवानगी असणार आहे.
परवानगीसाठी अग्निदिव्य
विवाह कार्य करून घ्यायचे असेल तर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे. ५० वऱ्हाडींनाच विवाहास येण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच मंगल कार्यालयात सामाजिक अंतर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वऱ्हाडी मंडळींना मास्क बंधनकारक असणार आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले तर कार्यवाहीला सामोरेही जावे लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.
असे आहेत विवाह मुहूर्त
जुलै महिन्यात ३, १३, १८, २२, २५, २६, २८, २९, ऑगस्ट महिन्यामध्ये ११, १४, १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ तर सप्टेंबर महिन्यामध्ये ८, १६, १७ असे विवाह आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २१ विवाह तिथी आहेत. विवाह होत आहेत. पण ५० वऱ्हाडी मंडळीमध्येच. जास्त वऱ्हाडी मंडळींना परवानगी नाही. त्यातही कोरोनाचे नियम सर्वांना बंधनकारक आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे कोरोनाचे नियम पुरोहितांनाही बंधनकारक आहेत. विवाह लावतेवेळेस पुरोहितांनी मास्क घालणे आवश्यक आहे, असे रेणुकादासगुरू कुलकर्णी यांनी सांगितले.
वधू-वर पित्यांची कसरत
विवाह मुहूर्ताच्या तारखा जास्त आहेत. परंतु, वऱ्हाडी मंडळींना जास्त प्रमाणात बोलवता येणार नाही. त्यामुळे मानपानापासून दूरच रहावे लागणार आहे. बाजारपेठेसाठी काही ठरावीक वेळ दिली आहे. त्यात वेळेतच कापड व अन्नधान्य खरेदी करावे लागणार आहे. एकंदर वधू-वर पित्यांना कसरत करावी लागणार आहे.
कोरोनाआधी थाटामाटात विवाह कार्य पार पडले. परंतु गत दीड वर्षापासून विवाह कार्य कमी वऱ्हाडींमध्ये होत आहेत. परिणामी रुसवे-फुगवे बंदच झाले आहेत. वऱ्हाडींना मंडपात विनामास्क फिरता येणार नाही. वऱ्हाडी मंडळी जास्त जमली की वर-वधू पित्यांना कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. मुला-मुलींचा विवाह करायचा झाल्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. विवाहासाठी परवानगी मिळविण्यासाठी वधू-वर पित्यांची धावपळ सुरू आहे.