गरिबांसाठीच्या स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजारात; १८५ पोती वाहनांसह जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 02:15 PM2022-06-20T14:15:07+5:302022-06-20T14:15:29+5:30
११ लाखांचा मुद्देमाल जप्त : कारवाईनंतरही गुन्हा दाखल नाही
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : काळ्या बाजारामध्ये घेऊन जाणारी स्वस्त धान्य दुकानातील १८५ पोते गहू व तांदूळ दोन वाहने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास औंढा नागनाथ पोलिसांनी औंढा ते हिंगोली रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पकडली. एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वस्त धान्य दुकानाचा माल दोन वाहनांतून नेला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास झुंजारे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजेदरम्यान सापळा रचला. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर संशयित दोन्ही वाहने तपासली असता त्यात मोठ्या प्रमाणात गहू व तांदूळ असलेली पोती आढळली. ही वाहने पोलीस ठाण्यात लावली आहेत. यात आयशर (एम.एच.- ३७- बी -१०८७) व पिकअप (एम. एच. -१२ -आर.एन.- ०९२६) या दोन्ही वाहनांत १८५ पोती गहू व तांदूळ आढळला. वाहने व माल असा मिळून साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. यातील वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांना कारवाईबाबत सूचना केली आहे. वाहनातील धान्य रेशनचेच आहे का? ते तपासण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. परंतु, रविवार असल्याने याबाबत महसूलच्या पुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांनी मात्र कारवाई केल्याची नोंद केली असली तरीही अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. यातील पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी दिली आहे. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अनिल लांडगे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, अफसर पठाण, गजानन गिरी, ज्ञानेश्वर गोरे, चालक संतोष धनवे यांचा समावेश होता.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून रेशनचा मोठा काळाबाजार होत आहे. औंढा तालुक्यात हे धान्य थेट बाजारात विक्री केले जात आहे. मागील एक वर्षापासून हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला असून, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस कारवाईनंतर ही मंडळी सुटत असल्याचे दिसून येत आहे.