गोरेगावात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:50+5:302021-01-10T04:22:50+5:30
गोरेगाव : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे येथील वातावरण तापले असून, दोन्ही गटांकडून प्रचाराचा जोर सुरू असताना ग्रा. पं. निवडणूक ...
गोरेगाव : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे येथील वातावरण तापले असून, दोन्ही गटांकडून प्रचाराचा जोर सुरू असताना ग्रा. पं. निवडणूक रणधुमाळीला चांगलीच रंगत आली आहे. मात्र या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने काही प्रभागातील लढत चुरशीची होणार असल्याचे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गोरेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की माजी आ. साहेबराव पाटील विरुद्ध माजी आ. भाऊराव पाटील यांच्या गटातील कट्टर विरोधी लढतीमुळे प्रत्येक वेळेस लक्षवेधी ठरली आहे. मात्र गत विधानसभा निवडणुकीपासून दोन माजी आमदार गोरेगावकरांमध्ये समन्वय झाला आहे. यामुळे दोन पारंपरिक कट्टर विरोधी गटांकडून यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक एकत्रितपणे लढविली जात आहे. तर दुसरीकडे डॉ. रवी पाटील, जि.प. सदस्य संजय कावरखे, माजी पं.स. सभापती नथ्थुजी कावरखे यांनी संयुक्त पॅनलच्या माध्यमातून माजी आमदारांच्या गटासमोर अवाहन उभे केले आहे.
निवडणुकीसाठी सहा दिवस शिल्लक असतांना दोन्ही गटांकडून घरोघरी भेटी, कॉर्नर बैठका तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा जोर सुरू आहे. पॅनल प्रमुखांसह राजेश पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष सुनील पाटील, प्रशांत पाटील, जि. प. महिला बालकल्याण सभापती रूपाली पाटील, माधवी पाटील आदींनी प्रचारात सहभाग घेतल्याने रंगत आली आहे.
एकूण १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण ६ प्रभाग असून दोन पॅनलचे ३४ तर अपक्ष २ एकूण ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यंदा बहुतांशी जुन्यांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. काहींनी वेगळ्या पॅनलमध्ये बस्तान मांडत बंडखोरी केली आहे. वाॅर्ड. १ मध्ये दोन अपक्षामुळे काय उलटफेर होईल, याबाबत तर्क- वितर्क लावले जात आहेत. वाॅर्ड क्र. ६ मध्ये दोन्ही गटांसाठी अस्तित्वाची लढाई असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.