हे सरकार अन् त्यांच्या योजनाही फेल -अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:14 AM2018-01-23T00:14:44+5:302018-01-23T00:14:50+5:30
सध्याचे भाजप सरकार फेकू सरकार आहे, अच्छे दिनच्या नावाखाली सरकारने केवळ शेतकरी व जनतेची लूट केली आहे. जेवढ्या योजना जाहीर केल्या, तेवढ्या फेल गेल्या. त्यामुळे हे सरकारही फेल गेल्याचा आरोप अजित पवार यांनी हिंगोली येथील गांधी चौकात २२ जानेवारी रोजी केला. ते हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्याचे भाजप सरकार फेकू सरकार आहे, अच्छे दिनच्या नावाखाली सरकारने केवळ शेतकरी व जनतेची लूट केली आहे. जेवढ्या योजना जाहीर केल्या, तेवढ्या फेल गेल्या. त्यामुळे हे सरकारही फेल गेल्याचा आरोप अजित पवार यांनी हिंगोली येथील गांधी चौकात २२ जानेवारी रोजी केला. ते हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावर, आ. रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, मुनीर पटेल, जगजित खुराणा यांच्यासह राष्टÑवादी काँगे्रसचे पदाधिकारी उपस्थित होते. हल्लाबोल सभेत हजारोंच्या संख्येने जनता सहभागी झाली होती. ते म्हणाले, शेतीमालास भाव नाही, हमीभाव खरेदी केंद्र बंद आहेत, पूर्वीच्या मालाचे चुकारे नाहीत, त्यातही भ्रष्टचार झाला. हिंगोलीतच हा घोळ झाला. एवढेच काय तर हिंगोलीत तर बाजार समितीच्या सभापतीलाच लाच घेताना पकडले. तर कामे करणाºयांच्या पाठीशी जनता का उभी राहात नाही, असा सवाल केला. दिलीप चव्हाण हे कामे करूनही पराभूत झाल्याचे ते म्हणाले. सध्याच्या भाजप-सेना सरकारने राज्याला कंगाल करून सोडले आहे. भाजप सरकारन सत्तेत आल्यापासून आठ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालणेच नव्हे, तर भ्रष्टाचाºयांना प्रवेश देवून पवित्र करण्याचा कार्यक्रम भाजपने हाती घेतला. शेतकरी आत्महत्या वाढल्या, ६७ हजार बालके कुपोषणाने दगावली अन् हे मुंबई पुणे मेट्रो, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या गप्पा मारत आहेत. अभ्यास तर एवढा करायला लागले की, धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाबाबत सरकार जायची वेळ आली तरीही अभ्यास संपत नाही असे पवार म्हणाले.
यावेळी धनंजय मुंडे यांनी उपहासात्मक शैलीत केंद्र व राज्य शासनावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक होवून अच्छे दिन आणण्याची खोटी आश्वासने दिली. त्याच आईच्या चरणी डोके ठेवून हे खोटारडे सरकार उलथवून टाकण्याची शक्ती मी मागितली, असे ते म्हणाले. लाटेत कमळाच बटन तर दाबल मात्र टीव्हीवरील लठ्ठपणा घालविण्याचा जाहीरातीचा दाखला देत ते म्हणाले, हे बटन दाबले की मठ्ठपणा येतो. महागाई संपली पाहिजे असे सांगणाºया भाजपने १ डिसेंबर २0१७ पासून आजपर्यंत १७ रुपयांनी पेट्रोल अन् १३ रुपयांनी डिझेल वाढविले. शेतीमालाला भाव नाही, व्यापार ठप्प झाला. तरीही तुम्ही नाराज नाहीत हेच भाजपने आणलेले अच्छे दिन आहेत. हे सरकार शेतकरीविरोधी आहे मात्र दाखवते शेतकºयांचा कैवारी असल्यासारखे. फडणवीस पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगतात, त्यांना गायीच्या दुधाची धार तरी काढता येते का? असा सवालही मुंढे यांनी केला. तर आघाडी सरकारने कोणताच अर्ज करायला न लावता ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली. यांनी सपत्निक अर्ज भरायला रात्री १२ वाजेपर्यंत आॅनलाईन केंद्रावर उभे केले. तेथे काय फडणविसांचा सत्यनारायणाचा कार्यक्रम होता काय, असेही ते म्हणाले. बोंडअळीला ३0 हजारांचे अनुदान जाहीर केले. ते विमा व बियाणे कंपन्या देणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ३0 पैकी ५ लाख हेक्टरचाच विमा आहे.
यावेळी तटकरे म्हणाले, तरुणाई सोशल मीडियातील प्रचाराला भुलली. आम्हीही कोट्यवधींची कामे केली पण त्याची कधी जाहीरात केली नाही. भाजप जातीयवादी भूमिका घेत असून त्यांच्यातील मनुवादी वृत्ती डोके वर काढत असल्याचा आरोप केला.
कार्यक्रमानंतर प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदनही दिले.
यांच्या काकांनी स्टेजवर टिकाव मारली होती का?
छत्रपतींच्या स्मारकाचा गवगवा तर केला. त्याचे पुढे काय झाले? एक दगडही लावला नाही. टिकाव मारण्यात हे पटाईत आहेत. एके ठिकाणी तर फडणवीस व ठाकरे यांनी स्टेजवरच उद्घाटनाची टिकाव मारली. यांच्या असे उद्घाटन केले होते का? असा सवाल करून माझ्या काकांनी तर असे कधी केले नाही, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
महसूलमंत्री पाटील यांची हकालपट्टी करा...
महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेजारच्या कर्नाटकात जावून त्या राज्याचा उदो-उदो करीत आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न माहिती असताना त्यांचे हे कृत्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची काही देणे-घेणे नसल्याचे सांगत आहे. त्यांनी एकतर राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रदीप नाईक, चित्रा वाघ, संग्राम कोते, अजिंक्य राणा, बसवराज पाटील, सोनाली देशमुख, शंकरअण्णा धोंडगे, ,गायकवाड, शशीकांत शिंदे या नेतमंडळीसह स्थानिकचे रत्नमाला चव्हाण, सुमित्रा टाले, अनिता सूर्यतळ, मनीष आखरे, बिरजू यादव, गणेश लुंगे, कैलास देशमुख, सुनील भुक्तर, संजय दराडे, आमेर अली आदी हजर होते. सूत्रसंचालन बी.डी. बांगर यांनी केले. तर आभार शहराध्यक्ष जावेद राज यांनी मानले.
यावेळी आ.वडकुते म्हणाले, लोकांना भाजपला मोठ्या आशेने निवडून दिले. मात्र त्यांनी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे काम केले. शेतीमालाला भाव देणे सोडा येथे खरेदी-विक्री संघाने चक्क घोटाळाच केला. शिवाय बाजार समितीचे भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजत आहे. बंधाºयाचेही गाजरच आहे. तर दिलीप चव्हाण म्हणाले, हिंगोलीत आघाडी सरकारच्या काळातच अडीचशे कोटींची कामे झाली. भाजपचा केवळ आश्वासनांचाच भुलभुलैय्या सुरू आहे.