अर्धापूर : सोयाबीन, कापूस, ज्वारी पिके हातची गेल्याने सध्याच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्यांना शासनाने मदत केली पाहिजे, अशी मागणी खा.अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक १ गाळप हंगामाचा प्रारंभ २ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले, सभापती वंदना लहानकर उपस्थित होत्या. यावेळी खा.अशोकराव चव्हाण म्हणाले, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे तीन युनिट कर्जमुक्त झाले असून चौथ्या युनिटच्या कर्जाची परतफेड चालू आहे. त्यामुळे नवीन पाचवा कारखाना चालवायला घेण्याएवढी आर्थिक बाजू भक्कम नाही. पण माझ्या मतदारसंघातील गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी सर्वस्वी प्रयत्न करील असे सांगितले. २0१३-१४ च्या हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या चार युनिटमध्ये १२ लाख ९३ हजार ४८३ मे. टन उसाचे गाळप यशस्वीरित्या पूर्ण केले. शेतकर्यांनी कारखान्याच्या ऊस लागवड योजनेत सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन गणपतराव तिडके यांनी प्रस्ताविकातून केले. भाऊराव चव्हाण कारखान्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील कारखाना चालवायला घेवून चार युनिट तयार केले. चारचा आकडा शुभ नसून पाचवा गोदावरी मनार साखर कारखाना भाऊराव कारखान्याने चालवायला घेवून पाच पांडवांचे समीकरण जुळवून आणावे अशी मागणी आ. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली. माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी काहीही करा अन् गोदावरी कारखाना चालवायला घ्या, म्हणत वसंतराव चव्हाण यांच्या मागणीचे सर्मथन केले. तसेच शेतकर्यांनी ऊस उत्पादकतेकडे लक्ष देवून कारखान्याला स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, सरचिटणीस संजय लहानकर, सभापती संजय बेळगे, कृउबा समितीचे सभापती माणिकराव जाधव, नगराध्यक्ष नासेरखान पठाण, उपसभापती सुनील अटकोरे, गंगाधर पाटील चाभरेकर, संजय लोणे, शंकरराव शिंदे, गंगाधरराव देशमुख, शंकरराव बारडकर, कारखान्याचे सर्व संचालकाची उपस्थिती होती. एकरी ११४ टन ऊस उत्पादन केल्याबद्दल आनंदराव तिडके यांचा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी तिडके यांनी व सर्व उपस्थितांचे आभार कैलाश दाड यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकर्यांना रबी हंगामासाठी चार व उन्हाळी हंगामासाठी पाच पाण्याच्या पाळ्या देण्यात येतील असे उध्र्व पैनगंगा प्रकल्प कालवा समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. /(वार्ताहर) |