पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी मुटकुळेंचे राज्यपालांकडे गा-हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:32 AM2018-02-03T00:32:06+5:302018-02-03T00:32:20+5:30
जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.
आवश्यक नसलेल्या प्रकल्पांसाठी यापूर्वी चुकीच्या पद्धतीने पाणी आरक्षित केल्यामुळे नवीन प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता होण्यास अडचण येत आहे. या प्रकरणी आ.तानाजी मुटकुळे यांनी १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील राजभवनावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेवून चर्चा केली. हिंगोली जिल्हा भेटीचे आग्रहाचे निमंत्रण दिले. याप्रसंगी राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी तातडीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्रे देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील व लवकरात लवकर कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार ५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी माजी आ. गजाननराव घुगे, इंजि. पी.आर.देशमुख, उत्तमराव जगताप, श्रीरंग राठोड, रवी देवकर आदींची उपस्थिती होती.
गेल्या अनेक दिवसांपासून आ.तान्हाजी मुटकुळे यांचा सिंचन अनुशेषासाठी पाठपुरावा सुरू होता. एक प्रश्न मार्गी लागला तर दुसरा निर्माण होत असल्याने ही कामे मार्गी लागण्यात अडचणी येत असून आता पाणी उपलब्धतेचा नवा लढा देण्याची वेळ आली आहे.