हळूहळू वाढतेय कामांची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:12 AM2018-11-17T00:12:29+5:302018-11-17T00:12:47+5:30
मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
समृद्ध महाराष्ट्रमधील कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या मागे मागील तीन वर्षांपासून लागले आहेत. त्यात आता हळूहळू यश येत आहे. मागील काही महिन्यांत ही कामे सुरू होत असल्याचे तर सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. सिंचन विहिरींची दहा हजारांपैकी ४३९१ कामे प्रशासकीय मान्यतेसह मंजूर केली. त्यापैकी २२४७ चालू असून याशिवाय ३७५ कामे पूर्ण झाली आहेत. यंदा दुष्काळात शेतकऱ्यांना या विहिरींचा फायदा झाला असता मात्र कामे पूर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे. १७६९ कामांना तर प्रारंभच नाही. अनेक गावांत उद्दिष्ट संपल्याचे सांगून नवीन काम दिले जात नाही. तर अनेक गावांत शेतकरी मंजूर आहे तेच काम करीत नाहीत. शेततळ्यांचे तर ५६00 एवढे उद्दिष्ट असताना केवळ ३२२ कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. यातील एकही काम अद्याप सुरू नाही. भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 एवढ्या उद्दिष्टापैकी ३७३ कामे प्रशासकीय मंजुरीनंतर सज्ज आहेत. मात्र यापैकी केवळ तीन कामेच सुरू झाली आहेत. भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंगचे २२00 कामांचे उद्दिष्ट असून यापैकी ४६६ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तर १५ कामे सुरू झाली असून २ पूर्ण झाली आहेत. निर्मल शौचालय योजनेतही २२00 चे उद्दिष्ट असून २२६ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १२0 कामे सुरू असून ८ पूर्ण झाली आहेत. निर्मल शोषखड्ड्यांचे २000 एवढे उद्दिष्ट असून ८८१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ४८७ सुरू तर ५0 पूर्ण झाली आहेत.
अंकुर रोपवाटिकेच्या २ लाख २0 हजारांच्या उद्दिष्टापैकी प्रस्तावच ६५ आहेत. त्यापैकी ६0 कामांना मंजुरी दिली. यातील ५५ सुरू झाली तर ४ पूर्ण झाली आहेत. नंदनवन वृक्षलागवडीतही १६00 कामांचे उद्दिष्ट असून २३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. यापैकी १८ कामे सुरू असून ५ सुरूच नाहीत. समृद्ध ग्राम योजनेतही १६00 पैकी ३६९ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. २७१ कामे सुरू असून याशिवाय ९0 कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे, गाव तलाव, वृक्षलागवड, व्हर्मी कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड यातील एकही काम पूर्ण झालेले नाही.
दरवर्षी मजूर नसल्याची बोंब कायम असते. यंदा मात्र दुष्काळी स्थितीमुळे शेतीत इतर कामे नसल्याने शेतकºयांत जनजागृती केल्यास त्यांच्याकडूनच ही कामे करून घेणे शक्य आहे. प्रशासनाने ही संधी साधण्याची गरज आहे.