महाराष्ट्र, तेलंगणा राज्यात धान्याची चोरी करणारी टोळी पकडली
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 29, 2023 06:48 PM2023-03-29T18:48:57+5:302023-03-29T18:50:44+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली : महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यात धान्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. यातील तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून १२ क्विंटल हरभरा, ४० क्विंटल सोयाबीन असा दोन लाख ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील दोन व वसमत तालुक्यातील कोठारी पाटी येथील एक दुकान फोडून चोरट्यांनी धान्य लंपास केले होते. या घटनांमुळे व्यापारी, नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या संदर्भात विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नही उपस्थित झाला होता. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी या बाबत तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना दिल्या होत्या. त्यावरून पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. यावेळी यातील ३ चोरटे दुधवाडी (ता. हिमायतनगर), वायपना (ता. हदगाव) येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यावरून पथकाने सापळा रचत परमेश्वर उर्फ बाबू रामू गायकवाड (रा. दुधवाडी), शिवमंगल इश्वरदिन मिश्रा (रा. बेरोंचा जि. कोसांबी, उत्तरप्रदेश), माधव मसाजी पवार (रा. वायपना ता. हदगाव) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच शफातउल्लाह इस्तीयाक चौधरी उर्फ इरफान (रा. सोनाळे जि. ठाणे, मूळ गाव टोला हजीजोत, ता. मधूबनी उत्तरप्रदेश), शेर मोहम्मद इकबाल खान उर्फ शेख उर्फ शाहरूख (रा.शांतीनंगर जि. ठाणे, मूळ गाव आझमगड उत्तरप्रदेश) यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. यातील दोघांच्या शोधात पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून १२ क्विंटल हरभरा, ४० क्विंटल ३० किलो सोयाबीन असा एकूण २ लाख ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
धान्य चोरी करणाऱ्या टोळीने यापूर्वी नांदेड, मुंबई, तेलंगणामधील निर्मल, अदिलाबाद येथेही अशाच प्रकारची चोरी केली. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलीआहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलिस अंमलदार भगवान आडे, राजूसिंग ठाकूर, विठ्ठल काळे, सुमित टाले, आकाश टापरे, रोहित मुदीराज, प्रमोद थोरात, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.