हरभरा आवक दुप्पट वाढली, हिंगोलीत मोंढ्यातील जागा पडतेय अपुरी
By रमेश वाबळे | Published: March 4, 2024 06:57 PM2024-03-04T18:57:02+5:302024-03-04T18:57:13+5:30
पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक निम्म्याखाली आली आहे.
हिंगोली : येथील मोंढ्यात हरभऱ्याची आवक जवळपास दुपटीने वाढली असून, ४ मार्च रोजी १ हजार १०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार ३३५ ते ५ हजार ८३५ रुपयांदरम्यान भाव मिळाला. आवक वाढल्याने नवा मोंढ्यात जागा अपुरी पडत असल्यामुळे हळद मार्केट यार्डात हरभऱ्याची बीट करण्यात आली. तर, पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक निम्म्याखाली आली आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घटले. काही भागातील शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी हरभऱ्यावर भर दिला. जिल्ह्यात यंदा तब्बल १ लाख ५६ हजार ७५० हेक्टरवर शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा केला होता. तर, ३६ हजार ४६ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला. बहुतांश भागातील हरभऱ्याची काढणी आटोपली असून, शेतकरी आता हरभरा विक्रीसाठी मोंढ्यात आणत आहेत. त्यामुळे आवक दुपटीने वाढली आहे. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ४०० ते ५०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी येत होता. तर, आता एक हजार क्विंटलच्या वर हरभरा विक्रीसाठी येत आहे. तर, दुसरीकडे मात्र पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे.
४ मार्च रोजी १ हजार १०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार ३३५ ते ५ हजार ८३५ रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. आवक वाढल्यामुळे नवा मोंढा भागात हरभरा टाकण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यामुळे बाजार समितीच्या निर्देशानुसार हरभऱ्याची बीट संत नामदेव हळद मार्केट यार्डात करण्यात येत आहे. जोपर्यंत नवी हळद बाजारात येत नाही, तोपर्यंत मार्केट यार्डातच हरभरा खरेदी- विक्रीचे व्यवहार होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
सोयाबीनची दरकोंडी कायम...
यंदा उत्पादनात झालेली घट पाहता सोयाबीनला किमान सहा हजाराचा भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून, प्रारंभापासून सोयाबीन पडत्या भावात विक्री करावे लागले. भाव वाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिने सोयाबीन घरात ठेवले. परंतु, भाव वाढण्याऐवजी घसरले. अजूनही सोयाबीनची दरकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
हळदीची आवक मंदावली...
येथील संत नामदेव मार्केट यार्डात मागील आठवड्यापासून हळदीची आवक मंदावली आहे. सध्या काही भागांत हळद काढणीचे काम सुरू झाले आहे. परंतु, ही हळद बाजारात विक्रीसाठी येण्यासाठी किमान पंधरवडा ते एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जुनी हळद आहे, ते आता विक्रीसाठी आणत आहेत. नवी हळद काढणीनंतर आवक वाढणार आहे.
सरासरी असा मिळतोय भाव...
मोंढ्यात सोमवारी तुरीला सरासरी १० हजार ५० रूपये, सोयाबीन ४ हजार २७०, हरभरा ५ हजार ५८५ तर हळदीला १४ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. यंदा सोयाबीन भाववाढीची कोंडी कायम असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.