ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:52 AM2021-02-05T07:52:20+5:302021-02-05T07:52:20+5:30
हिंगोली : ग्रामपंचायत निवडणूक होऊन आजमितीस १४ दिवस लोटले आहेत. अजूनही मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा करावी ...
हिंगोली : ग्रामपंचायत निवडणूक होऊन आजमितीस १४ दिवस लोटले आहेत. अजूनही मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडून या संबंधिची माहिती वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आली नाही, असे जिल्हा कार्यालयातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. सदरील निवडणूक जिल्ह्यातील १ हजार २७६ केंद्रांवर घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि हिंगोली येथील मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचारी संख्या एकूण ५ हजार १०० एवढी होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायतला निधी येत नाही. त्या प्रमाणात ग्रामपंचायतीचे मानधन देण्यासाठी बजेटही नसते, असेही काही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान केंद्राध्यक्षांना ७०० रुपये आणि कर्मचाऱ्यासाठी ५०० रुपयांचे मानधन दिले जाते, असे ग्रामपंचायत निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. १४ दिवस उलटले तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने त्यांना हक्काच्या मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी रोजी झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर हे मानधन नसते. यासाठी स्वतंत्र बजेट असते. परंतु, अजून तरी बजेट पूर्णपणे आलेले नाही. मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचारीही विचारणा करीत आहेत. तूर्तास नियमाप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षांना ७०० आणि कर्मचाऱ्यांना ५०० रुपये याप्रमाणे मानधन काही दिवसात वाटप केेले जाईल.
- पांडुरंग माचेवाड, तहसीलदार, हिंगोली
जिल्हा कार्यालयात डाटाच नाही
जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, सेनगाव, औढा नागनाथ आणि हिंगोली या पाच तालुक्यात १५ जानेवारी रोजी ४२२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. या काळात काम केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांची मानधनाची माहिती तालुक्यांनी द्यायला पाहिजे. परंतु, अजून मानधनासंदर्भात कोणतीही माहिती अजून आलेली नाही, असेही ग्रा. पं. निवडणूक विभागातून सांगण्यात आले.