Gram Panchayat Voting : यादीत दोन वेळा नाव असल्याचा घेतला गैरफायदा; बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 06:26 PM2021-01-16T18:26:33+5:302021-01-16T18:30:16+5:30
Gram Panchayat Voting मी मतदानच केले नाही, माझ्या नावावर कोणीतरी मतदान केले ' असा दावा त्याने केला
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : एकाच मतदार यादीत दोन वेळा नाव असल्याचा फायदा घेत दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारावर आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश संजय बोंढारे असे गुन्हा दाखल झालेल्या मतदाराचे नाव आहे. या प्रकरणामुळे बोगस मतदान व सदोष मतदार याद्यासह वेगळ्याच प्रश्नांना वाचा फुटली आहे.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 3/4 -अ मध्ये नागेश संजय बोंढारे हा मतदार दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी आल्याचे उपस्थित प्रतिनिधीला लक्षात आले. प्रतिनिधींनी ही बाब केंद्र अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्या मतदाराने मतदान यादीतील क्र. 1720 यावर सुरुवातीला मतदान केले होते. परंतु, तो मतदार यादीतील क्र. 978 या नावावर पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला. यानंतर रात्री उशिरा मतदान केंद्र अधिकारी देवानंद रमेशराव पंडित यांच्या फिर्यादीवरून नागेश संजय बोंढारे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 171 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय मार्के करीत आहेत.
माझ्या नावे बोगस मतदान झाले
सदर गुन्हा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रात्री उशिरा मध्यरात्री दाखल झाला आहे. एकाच मतदार यादीत दोन वेळा नाव कसे आले? याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे .तर सदर व्यक्तींवर मतदान करताना आक्षेप नोंदवला असता ' मी मतदानच केले नाही, माझ्या नावावर कोणीतरी मतदान केले ' असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे शांततेत पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत बोगस मतदान झाले की काय? याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहेत.