काय सांगता ! उमेदवारांनी मिळालेले चिन्ह सोडून केला भलत्याच चिन्हाचा प्रचार; मतदानावेळी उडाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 06:16 PM2021-01-15T18:16:36+5:302021-01-15T18:23:31+5:30
gram panchayat election उमेदवारांनी चिन्ह कोणते मिळाले याची खात्री न करता जे चिन्ह मागितले होते, त्याचाच प्रचार केला.
वसमत : तालुक्यातील लोण बु. येथे मतदान प्रारंभ होताच उमेदवारांनी मतदान यंत्रावर भलतेच चिन्ह असल्याचा आक्षेप घेतल्याने गोंधळ सुरू झाला. त्यामुळे वार्ड क्र. १ चे मतदान थांबले होते. तहसीलदार व अधिकाऱ्यांनी भेट देवून संभ्रम दूर केला व दुपारनंतर मतदान सुरळीत झाले. उमेदवारांना मिळालेल्या चिन्हाऐवजी भलत्याच चिन्हांचा प्रचार उमेदवारांनी केल्याचा प्रकार यावेळी पहावयास मिळाला.
चिन्ह वाटपाच्या वेळी लोण बु. येथील वार्ड क्र १ मधील उमेदवारांनी चिन्हांचे प्राधान्यक्रम दिले होते. यात एकाने पतंग तर दुसऱ्याने उगवता सूर्य मागितला होता. मात्र हे दोन्ही चिन्हे अयोगाच्या यादीत नसल्याने उमेदवारांना निवडणूक निर्णय अधीकाऱ्यांनी ती नाकारली. पतंगाऐवजी गॅस सिलेंडर तर उगवता सूर्यऐवजी सूर्यफुल हे चिन्ह प्रदान केले. मात्र उमेदवारांनी चिन्ह कोणते मिळाले याची खात्री न करता जे चिन्ह मागितले होते, त्याचाच प्रचार केला. आज मतदान सुरू झाले व उमेदवारांनी पाहिले तर मशीनवर प्रचार केलेले चिन्हच नव्हते. त्यामुळे गोंधळ झाला. आपले चिन्ह बदलून आल्याचा आक्षेप घेत या उमेदवारांनी मतदान थांबवले.
तहसीलदारांनी दाखवला चिन्ह मागणी अर्ज
यानंतर लोण येथे तहसीलदार अरविंद बोळंगे, नायब तलसीलदार सचिन जैस्वाल, पळसकर, डीवायएसपी हाश्मी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी व अधिकाऱ्यांनी भेट दिली. तहसीलदारांनी उमेदवारांनी चिन्ह मागणी केलेला अर्ज व प्रदान केलेले चिन्ह दाखवले व कोणाची चूक आहे. हे दर्शवले व आता मतदान सुरू करू, असे आवाहन केले. उमेदवार व समर्थकांनी काही वेळ वाद घातला, मात्र चूक समजल्याने मतदान सुरू झाल्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.
दुपारनंतर सर्व मतदान सुरळीत
सपोनि विलास चवळी यांच्याशी संपर्क साधला असता वाद व गोंधळ झाला नव्हता फक्त खात्री न केल्याने संभ्रम झाला होता. तो दुर झाल्याचे सांगितले. फक्त वार्ड क्र १ मध्येच मतदार थांबले होते. अन्य दोन वार्डात मतदान सुरळीत होते. दुपारनंतर सर्व मतदान सुरळीत झाले असल्याचे सपोनि चवळी यांनी सांगितले.