गुराढोरांसह ग्रामस्थ उतरले रस्त्यावर; उपासमारीमुळे सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:29 AM2019-07-22T02:29:40+5:302019-07-22T02:29:56+5:30
मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश धाब्यावर
सेनगाव (जि. हिंगोली) : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या ग्रामस्थांनी ताकतोडा गाव विक्रीला काढल्याची सरकारी पातळीवर पुरेशा गांभीर्याने दखल घेतली न गेल्याने अखेर ग्रामस्थ गुराढोरांसह रस्त्यावर उतरले आहेत.
शासकीय योजनांचा लाभ मिळत नसलेल्या ताकतोडा गावाची व्यथा लोकमतने मांडल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेतली. गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तहसीलदारांना गावात जाऊन दोन दिवसांत सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. मात्र तहसीलदार व स्थानिक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केवळ आश्वासने दिली. त्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रविवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर गुराढोरांसह दिवसभर आंदोलन केले.
फसवी कर्जमाफी, पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने शेतकºयांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. तीन दिवसांपासून शासनाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन रविवारी कायम होते. जबाबदार व्यक्ती मागण्या मान्य करेपर्यंत ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
स्थानिक अधिकाºयांची आश्वासने फसवीस्थानिक अधिकाºयांची आश्वासने फसवी
तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी पीकविमा, कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यांसह पीककर्ज देण्याची मागणी केली. मात्र, पीकविमा व कर्जमाफी हे शासन स्तरावरील मुद्दे असल्याने ते शासनाकडे पाठवू, असे तहसीलदारांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांचे समाधान झालेले नाही. आश्वासने फसवी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.