ग्रामसेवक अन् बीडीओही मुख्यालयी राहिनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:50 AM2019-06-07T00:50:12+5:302019-06-07T00:50:33+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.
जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, अतिमुकाअ पी.व्ही. बनसोडे आदींची उपस्थिती होती. ग्रामसेवक मुख्यालय राहात नसल्याच्या मुद्यावरून सुरुवातीलाच सेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी रान पेटविले. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थ डोक्यावर हंडे वाहात आहेत. मात्र ही बाब ग्रामसेवकांना माहितीच नसते. काही ठिकाणी पाणी असूनही गावातील राजकीय वादातून बंद हातपंप, नळयोजना दुर्लक्षित राहते. ग्रामसेवक सजग असल्यास हे प्रकार टाळता येतात. मात्र ते गावात राहातही नाहीत अन् येतही नाहीत. किती ग्रामसेवक मुख्यालयी असे विचारताच बीडीओ निरुत्तर झाले. तर किती बीडीओ मुख्यालयी राहतात, हे विचारल्यावर फक्त हिंगोली वगळता इतर कोणीच राहात नसल्याचे आढळले. त्यामुळे तीन दिवसांत ग्रामसेवकावर कारवाई तर बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे उपमुकाअ नितीन दाताळ यांनी सांगितले. त्यानंतर औंढा पंचायत समितीत सिंचन विहिरीचे काम अन् दाम हे समीकरणच बनल्याच्या तक्रारी घेऊन लोक आमच्याकडे येतात. प्रशासन असे वागत असेल तर काय उत्तरे द्यायची, असा सवालही आहेर यांनी केला. यापुढे सभागृहात चुकीची उत्तरे अथवा एरवही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर सभागृह त्याची गय करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही आहेर यांनी यावेळी दिला. समितीवरील बहुतांश सदस्य उपस्थित होते.